जीवनसत्वासह पैसा मिळवून देणारा आवळा
जीवनसत्वासह पैसा मिळवून देणारा आवळा आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या पिकाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळ्यापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, फळांचे आहारदृष्ट्या महत्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळा या फळपिकाच्या लागवडीस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आवळा या फळझाडाचे उगमस्थान दक्षिणपूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतातील आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडे श्रीलंकेपर्यंत हे झाड चांगले वाढते. समुद्रसपाटीपासून तेराशे मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ चांगली होते. भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम इत्यादी राज्यात आवळ्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तसेच अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपुर, भंडारा, नागपुर, जळगाव व यवतमाळ या भागातील जंगलात आवळ्याची झाडे आढळतात. चवीला तुरट आणि आंबट असलेल्या आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असते. जीवनसत्वासह आवळा आपल्याला पैसा देतो. हो, प्रक्रिया उद्योगातून आपण आवळ्याच्या फळापासून मुरब्बा, सॉस, कॅन्डी, वाळलेल्या चकत...