कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष.
कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष. शेतकरी बंधुंनो कडुनिंबाचा प्रत्येक भाग हा बहुगुणी व बहुपयोगी असून त्याचे व्यापारी तत्त्वावर सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण या पहिल्या भागात कडूनिंबा मधील विविध भागाचे उपयोग व महत्त्व तसेच सारांश रुपात कडुनिंबाच एक झाड मानवाला त्याच्या आयुष्यात सरासरी काय देणगी देऊन जातं या बाबी विषयी थोडे जाणून घेऊ या. (A) कडुनिंबाच्या विविध भागाचे उपयोग व महत्व (१) कडुनिंबाची पाने : कडू निंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानाचा रस पितात किंवा पाने खातात. गजकर्ण, सूज ,हिवताप ,आतड्यातील बुरशी, इत्यादी व्याधीवर कडुनिंबाचा काढा प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.जखमा लवकर भरून येण्यासाठी कडुनिंबाची पाने ठेचुन जखमेवर बांधतात. कडुनिंबाची पाने कडू व शीतकारक असतात. कडुनिंबाच्या पानांची पावडर तयार करून दंतमंजन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो.घरगुती धान्य दीर्घकाळ टिकण्यासाठी कडूनिंबाच्या पानाचा कीड प्रतिरोधक म्हणून उपयोग केला जातो. नैसर्गिक रित्या कडुनिंबाच्या पानगळी मुळे जमिनीत सेंद्रिय पद...