पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?
शेती : पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते? पेरणी झाली, पण पाऊसच नाहीये. आधी बरा पाऊस झाला, त्यामुळे पेरणी केली. पण आता 8 दिवसापासून पाऊस नाही," असं माझे वडील मला सांगत होते . ही काही फक्त माझ्या वडिलांची एकट्याची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांसमोर आज दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. कारण सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारली आहे. त्यामुळे पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काय करायला हवं? यासाठीचे काही शास्त्रीय निकष आहेत का? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कृषी विभागाचा सल्ला सुरुवातीला महाराष्ट्राच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना जो सल्ला दिलाय, तो जाणून घेऊया. जोपर्यंत तुमच्या भागात 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय, "राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जूनपर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्य...