पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?

 

शेती : पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?    

पेरणी झाली, पण पाऊसच नाहीये. आधी बरा पाऊस झाला, त्यामुळे पेरणी केली. पण आता 8 दिवसापासून पाऊस नाही," असं माझे वडील मला सांगत होते.

ही काही फक्त माझ्या वडिलांची एकट्याची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांसमोर आज दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे.

कारण सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारली आहे.
त्यामुळे पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काय करायला हवं? यासाठीचे काही शास्त्रीय निकष आहेत का? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कृषी विभागाचा सल्ला
सुरुवातीला महाराष्ट्राच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना जो सल्ला दिलाय, तो जाणून घेऊया.

जोपर्यंत तुमच्या भागात 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय, "राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जूनपर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये."

पण, मग पेरणीची योग्य वेळ कोणती? हे शेतकरी कसं समजून घेऊ शकतात?

पेरणीची योग्य वेळ ओळखण्याचे 3 उपाय
पेरणीची योग्य वेळ कशी ओळखायची असा प्रश्न आम्ही राज्यातल्या शेती अभ्यासकांना विचारला. त्यांनी काय उत्तरं दिली ते पाहूया.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार सांगतात, "75 ते 100 मिलीमीटर म्हणजेच 3 ते 4 इंच पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण 3 ते 4 इंच इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होते. पण 1 ते 2 इंच इतकाच पाऊस पडला आणि पेरणी केली तर मग मात्र दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता असते."

डॉ. सुभाष टाले निवृत्त विभागप्रमुख, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सांगतात, "पावसात जोपर्यंत सातत्य येत नाही, तोवर पेरणी करू नये. एखादा शेतकरी पेरणी करतो आणि लगेच पाऊस येतो. त्याचं पाहून इतर शेतकरीही पेरणीसाठी गडबड करतात. हे टाळायला हवं."
डॉ. रवी आंधळे, सहयोगी प्राध्यापक, ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या मते, "100 मिलीमीटर पर्यंत पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी अजिबात पेरणी करू नये. कारण असं केल्यास पीक व्यवस्थित उगवत नाही. पेरणी करायचीच असेल तर आपल्याकडील उपलब्ध पाणीसाठा पाहून शेतकऱ्यानं निर्णय घ्यावा."

ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा या प्रकल्पाच्या माध्यमांतून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पीक निहाय सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. पुढचे 5 ते 6 दिवस पाऊस पडणार नाही, असा आयएमडीचा अंदाज असल्याचं ते सांगतात.

दुबार पेरणी टाळ्यासाठीचे 3 उपाय
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यात जवळपास 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आता हे शेतकरी दुबार पेरणीचं संकट कसं टाळू शकतात, असंही आम्ही या तज्ज्ञांना विचारलं.

1) दुबार पेरणी टाळण्यासाठीच्या उपायांविषयी डॉ. सूर्यकांत पवार सांगतात, "तुम्ही जर पेरणी केली असेल आणि काही प्रमाणात पीक उगवून आलं, असेल तर पोटॅशियम नायट्रेट हे जल विद्राव्य खते म्हणजे पाण्यात विरघळणारी खते (13:00:45)चे 70 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी टाकून फवारणी करावी. पोटॅशियममुळे रोपांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते."

2)तसंच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत जसं की विहीरी, तलाव, ठिबक किंवा तुषार सिंचन उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावं.

3)डॉ. सुभाष टाले यांच्या मते, "तुमच्या शेताच्या आसपास जो काही पाण्याचा साठा उपलब्ध असेल मग यात तलाव, नाला, शेततळं यांच्यातील पाण्यानं पिकांवर फवारणी होईल. जास्त पाणीही देऊ नये. अगदी 1 सेमी इतका जमिनीत ओलावा तयार होईल, इतकं पाणी द्यावं, यामुळे पिकाच्या कोंबाला ओलावा मिळेल आणि काही दिवस ते तग धरू शकेल."

अजूनही पेरणीची वेळ गेलेली नाहीये. आपल्याकडे खरीप पिकांची पेरणी 15 जुलैपर्यंत होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाता कामा नये, असं डॉ. रवी आंधळे सांगतात.
लेखक:
श्रीकांत बंगाळे

 *_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?