शेतकऱ्यांनो तुम्हाला कमी उत्पन्न येत कां ? जाणून घ्या रासायनिक खते वापरण्याची पद्धत
शेतकऱ्यांनो तुम्हाला कमी उत्पन्न येत कां ? जाणून घ्या रासायनिक खते वापरण्याची पद्धत भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे जमिनीचे आरोग्य टिकून राहण्याकरिता व शाश्वत पीक उत्पादन मिळविण्याकरिता रासायनिक खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच झाला पाहिजे. रासायनिक खते वापरताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित पिकात सेंद्रिय खते, जैविक खते व माती परीक्षणाच्या आधारावर योग्यवेळी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा तसेच विद्राव्य खतांचा संतुलित वापर झाला पाहिजे म्हणजे जमिनीचे आरोग्य टिकून राहील व पीक उत्पादनात वाढ होऊन शेतकरी बंधूंचे निव्वळ उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा फायदा होईल. आज आपण या अनुषंगाने रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्याकरिता कोणत्या सर्वसाधारण बाबीचा अंगीकार करावा याबाबत काही टिप्स पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो सर्व पिकांमध्ये खते देण्यापूर्वी सर्वप्रथम माती परीक...