उसाची जात कशी निवडावी
*_🎋उसाची जात कशी निवडावी?🎋_*
*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
_१५ ऑगस्ट,१९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. लहानपणी आम्ही दूरदर्शनवर त्या दिवसाचे दृश्य बघायचो. हजारोंच्या संख्येनी जनता रस्त्यावर उतरली होती. आज त्यांच्यावर कोणतेही बंधने नव्हती. जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून ऐतिहासिक भाषण दिले होते. त्यांचे बोल आजही माझ्या कानात गुणगुणतात. इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून त्याची जागा आपला तिरंगा ज्यावेळी घेतो त्यावेळी आमची छाती अभिमानाने फुलून जाते. ह्या देशाचा नागरीक असण्याचा ह्या प्राचीन सभयतेचा भाग असण्याचा मला अभिमान वाटतो. त्याच वेळेस ऐका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होते की, आज मी इथे बसून जिलेबी खातोय ह्यासाठी त्याकाळी कोणीतरी पाठीवर फटके खाल्ले होते. आज मी कितीही गरीब असलो तरीही मी माझे पोट भरू शकतो पण त्याकाळी काही लाख लोकांनी उपासमारीमुळे आपला जीव सोडला होता. आज मी व्यक्त होऊ शकतो, सरकारचा नीतीची टीका करू शकतो आज माझवर कोणतेही बंधनं नाहीत पण त्याकाळी पत्रकारांना कित्येक वर्षे तुरुंगात डांबले जाई. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या देशाप्रती कर्तव्य आहे. तिच्यासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्याच कर्तव्याची जाणीव ठेवून काही लोकांनी महाराष्ट्रात सहकाराचे जाळ पसरवले.हजारो एकरवर उसाचे पीक आनंदाने डोलू लागले. हळूहळू शेतकरी सधन होत गेला. नवनवीन जातींची निर्मिती झाली. प्रत्येक परिस्थितीसाठी विशिष्ट जात तयार करण्यात आली. आज ह्याच जातींबद्दल आपण जाणून घेणार आहोत._
_उसाचा हजारो जाती आहेत. प्रत्येक जातीचे गुणदोष हे वेगवेगळे असतात. आज मी आमचा शेतामध्ये विविध परिस्थितीमध्ये लावण्यात येणाऱ्या वाणांची माहिती व आम्ही तो वाण कसा निवडतो हे सांगणार आहे._
*_🔥०२६५ :_* _ही जात २००७ साली लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली. क्षारपड जमिनीसाठी ही उत्तम जात आहे. क्षारपड जमिनीमध्ये इतर जातीतील उसाची लागवड अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही. पण ह्या जातीमुळे क्षारपड जमिनीतही शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.आजपर्यंत बऱ्याच उसाचा जाती बघितल्या आहेत. जर फुटवा जास्त असेल तर त्याला जाडी कमी असते,जाडी जास्त असेल तर फुटवा कमी असतो. पण ह्या जातीचा बाबतीत फुटवा ही जास्त असतो व जाडीही चांगली असते. ह्या जातीचा खोडवाही चांगला येतो. पानं तलवारीसारखे सरळ असतात. ह्या उसाचा फडात आत जायचं म्हणजे तोंड आणि पूर्ण शरीर झाकून जावं लागतं अन्यथा पानांचे काप सहन करावे लागतात.रसवंती किंवा गुळासाठी हा वाण अयोग्य ठरतो. ह्याचा वापर बेनेमळा व साखर उद्योगामध्ये होतो. ह्या वाणामध्ये तंतुमय पदार्थ इतर वाणांचा तुलनेने जास्ती असतात. शेतकऱ्यांचा व कारखानदारांचा मनात एक ग्रह निर्माण झाला आहे की ०२६५ ह्या वाणाची रिकव्हरी कमी येते. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने ह्याच वाणाचा जोरावर सर्वात जास्त रिकव्हरी नोंदवली आहे.वयक्तिक हा वाण माझा ही आवडीचा वाण आहे. समस्या एकच आहे की हा वाण साखर कारखाने लवकर तोडत नाहीत. ऊस शेतकऱ्याचे खऱ्या अर्थाने उत्पादन वाढवण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. ज्या क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आशा ठिकाणी आम्ही ह्या वाणाची लागवड करतो. कारण ह्या वाणाचा मुळ्यांचे जाळे इतर वाणांपेक्षा अधिक गुंतलेले असते. त्यामुळे नुकसान थोडे कमी होते. आम्ही हुमणीसाठी वर्षभर केलेल्या प्रयत्नांमुळे हुमणीचा प्रादुर्भाव खुप कमी होतो.पण तरीही जोखीम कमी करण्यासाठी आम्ही ह्या वाणाचा वापर करतो._
*_📌को-८६०३२ :_* _१९९६ साली प्रसारीत झालेला वाण. महाराष्ट्रातील एकूण ऊस शेतीमध्ये जवळपास ५०% क्षेत्र हे ह्या वाणाचा लागवडी खाली आहे. १०० टन, १२५ टन,१५० टन एवढे उत्पादन गाठण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे रिकव्हरी ही ह्या वाणाची चांगली मिळते. फुटव्यांची संख्या जास्त असते, पण उसाची जाडी ०२६५ ह्या वाणाचा तुलनेत थोडी कमी असते. गडद गुलाबी व लालसर छटा असलेला हा ऊस आपल्या गर्द हिरव्या पानांनी मोहित करते.ह्या वाणाचा गुळ चांगला होतो. रसवंतीसाठीही हा वाण वापरला जातो पण अपेक्षित चव मिळत नाही. कांडी कीडीचा प्रादुर्भाव ह्या वाणावर मोठ्या प्रमाणात होत असतो. नवीन वाण ज्यावेळी प्रसारीत केला जातो त्यावेळी शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न विचारला जातो ८६०३२ पेक्षा चांगला वाण आहे का? शेतकऱ्याला आजही ह्या वाणाचा तोडीचा वाण सापडला नाही. आम्ही बेणेमळासाठी ह्या वाणाची लागवड करतो. क्षारपड जमीन सोडल्यास इतर सर्व प्रकारच्या जमिनी मध्ये ह्याची वाढ खुप चांगली होते. मुरमाड व मध्यम जमिनीमध्ये हा वाण खुप चांगले उत्पादन देते._
*_🌈एम एस १०००१ :_* _२०१७ साली प्रसारीत झालेल्या ह्या वाणाने अल्पावधीतच शेतकऱ्यांची मने जिंकली आहेत. १२ महिन्यात चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे. ज्यावेळी आपण खरीपमध्ये एखादे पीक घेतो व ऑक्टोबर मध्ये उसाची लागण करायची असेल त्यावेळेस हा वाण एक उत्तम पर्याय आहे. कारखाने ही आपल्या यादीमध्ये ह्या वाणाला प्रथम प्राधान्य देतात.साखरेचा उताराही चांगला आहे.परंतु १२ महिन्यानंतर उशीर झाल्यास उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ह्याचा खोडवा खुप चांगला येतो. ज्यावेळी आमचा ८६०३२ चा ऊस तुटून जातो व त्यामध्ये तुटाळ पडतो त्यावेळी आम्ही ह्या वाणाची रोपे लावतो. हा ऊस कमी कालावधीत जास्त वेगाने वाढतो. फुटव्यांची संख्या पण चांगली असते त्याची जाडी ही चांगली असते. १०००१ ह्या वाणाचा गुळ चांगला होतो. आमचा ऐका शेतकरी मित्राने ह्या वाणाचे सेंद्रिय गुळ बनवला आहे. ह्याचा गुळाला एक विशिष्ट चव व सुगंध असतो.१२ महिन्यात १०० टनाचे उत्पादन घेण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे.काही शेतकऱ्यांचा जमिनी खारवट चोपण असतात. आशा जमिनीला ही जात चांगला प्रतिसाद देते._
*_💥कोसी ६७१ :_* _उसामध्ये असलेल्या वेगवेगळे वाण तयार करण्यासाठी ह्या जातीचा वापर झाला आहे. काही जातींसाठी ही जात पित्याचा भूमिकेत आहे तर काही जातींसाठी ही जात मातेचा भूमिकेत आहे._
_🍬८६०३२,९४०१२,फुले ९२००५, वी एस आय ४३४ वरील सर्व वाण कोसी ६७१ ह्या वाणामधून तयार झाले आहेत. रसवंतीचा विचार केल्यास ह्या वाणाचा तोडीला कोणतीही जात उपलब्ध नाही. ह्या जातीतील रसाची चव त्याचा रंग सुगंध आणि आलं लिंबू बरोबर झालेला संयोग ह्याला कोणतेच वाण टक्कर देऊ शकत नाही. ह्या वाणामध्ये साखरेचा उतारा इतर वाणाचा तुलनेने जास्त आहे. ज्या साखर कारखान्यांनी ६७१ ह्या वाणाची ६०% पेक्षा जास्त गाळप केला आहे त्या कारखान्यांचा साखर उतारा सर्वात जास्त आहे.ह्या जातीचा गुळही उत्तम होतो. ही जात पूर्वहंगामी आणि सुरू हंगामासाठी योग्य आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाला चोरीचा सामना करावा लागतो आशा ठिकाणी शेतकऱ्यांनी ह्या वाणाची लागवड करावी. ह्या उसाचा देठाला मोठ्या प्रमाणात तुस असते. त्यामुळे पाला चोरीसाठी हा नैसर्गिक अडथळा निर्माण होतो._
_वरील ४ जातींचा आम्ही आमचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करतो. प्रत्येक शेतकऱ्याचे अडचणी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकजण उसाची लागवड वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी करतो. काहीजण त्याचा वापर रसवंतीसाठी करतात तर काही जण त्याचा वापर गुळाचे उत्पादन घेण्यासाठी करतात. काही जण फक्त बेणेमळा करतात,तर काहीजण साखर कारखान्यावर अवलंबून असतात. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार आपल्या जमिनीचा गुणधर्मानुसार वाणाची निवड करावी. काही ठिकाणी जमीन गावा जवळ असते तिथे ८६०३२ सारख्या वाणाची लागवड केल्यास पाला चोरीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. त्याजागी ६७१ अथवा ०२६५ ह्या वाणाची लागवड केल्यास पालाचोरी थोड्या प्रमाणात नियंत्रित करता येते. क्षारपड जमिनीमध्ये ०२६५ ह्या वाणा शिवाय पर्याय नाही. चांगली उत्तम निचऱ्याची जमिनीमध्ये जिथे पाला चोरीची समस्या उद्भवत नाही अशा ठिकाणी ८६०३२ ह्या वाणाची लागवड निश्चित करावी. मातीचा गुणधर्म टिकवण्यासाठी वाणामध्ये बदल ही करणे गरजेचे आहे. प्रत्येक वाणाचा मुळ्यांचे जाळे हे निराळे असते. वाणामध्ये बदल केल्यास जमिनीचा भौतिक गुणधर्म टिकविण्यास मदद मिळते. शेतकऱ्यांनी वाणाची निवड आपल्या परिस्थितीनुसार करावा. ह्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल._
*_┅●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●┅_*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा