पपईपासून करा अनेक पदार्थ ; मिळवा अधिक नफा

पपईपासून करा अनेक पदार्थ ; मिळवा अधिक नफा

पपई हे नाशवंत फळ असून फळाची वाहतूक सुद्धा अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. बाजारात नेत असताना वाहतूकीमध्ये बरीच फळे खराब होत असतात.  उत्पादकाचे नुकसान होऊन उत्पादन खर्चही निघत नाही. अशावेळी बाजारभाव, मागणी इ. मुद्द्यांचा अभ्यास करून पपईची प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास जास्तकाळ टिकणारे व योग्य मोबदला देणारे होऊ शकते... तर कोणकोणती प्रक्रियायुक्त पदार्थ याची माहिती आपण घेणार आहोत...

बाटलीबंद ज्यूस

पपईपासून बनवलेला जॅम

पपई गराची पोळी

 टुटी - फ्रुटी

 बाटलीबंद ज्यूस:

अतिपुरवठा कालखंडात पपईचा बाटलीबंद ज्यूस करून साठवून ठेवता येतो. अन्न सुरक्षा व प्रमाणके प्राधिकरणाने केलेल्या व्याख्येप्रमाणे १०० मिली फळाच्या बाटलीबंद रसामध्ये त्या फळाचा १० मिली गर व रसातील अंतिम साखरेचे प्रमाण १० टक्के असणे आवश्यक आहे. बाटलीबंद पपईचा रस बनविण्यासाठी पिकलेली परिपक्व फळे निवडून घ्या. फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व फळांची साल काढा. फळातील बिया व अनावश्यक भाग वेगळा करून पपईचा गर बनवून घ्या. अन्न सुरक्षा व प्रमाणके प्राधिकरणाच्या व्याख्येनुसार पपईचा गर वापरून रस बनवून घ्या. रसातील साखरेचे प्रमाण रिफ्रॅक्टोमीटर या उपकरणाने मोजून आवश्यक तेवढी दळलेली साखर रसात टाकून ६५ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानावर ते मिश्रण ढवळत शिजवा. मिश्रणात योग्य प्रमाणात सायट्रिक आम्ल टाका. मिश्रण मिक्सर किंवा होमोजिनायझर मधून एकजीव करा व सुयोग्य चाळणीतून गाळून घ्या. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरा आणि बाटल्या पॅकबंद करून योग्य तापमानावर साठवा.

पपईपासून बनवलेला जॅम:

पिकलेल्या पपईच्या फळाचा गर वापरून हा पदार्थ बनवता येतो. सर्वात आधी पिकलेली परिपक्व फळे निवडून घ्या. फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व फळांची साल काढा. फळातील बिया व अनावश्यक भाग वेगळा करून पपईचा गर बनवून घ्या. गरातील साखरेचे प्रमाण रिफ्रॅक्टोमीटर या उपकरणाने मोजून योग्य त्या प्रमाणात साखर घालून मंद आचेवर मिश्रण ढवळत रहा. त्यांनतर आवश्यक प्रमाणात सायट्रिक आम्ल व पेक्टिन पावडर मिश्रणात टाकून मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे (साखर) प्रमाण ६७ - ६८ डिग्री ब्रिक्स होईपर्यंत शिजवा. तयार मिश्रण विशिष्ट्य तापमानावर काचेच्या बाटल्यांमध्ये भरा. थंड झाल्यानंतर बाटल्यांची झाकणे लावून झाकणांना वॅक्सिंग करून बाटल्या विशिष्ट तापमानावर साठवा. पपई पासून बनवलेला जॅम ६ ते ८ महिन्यापर्यंत टिकतो.

पपई पासून टुटी - फ्रुटी:

परिपक्व झालेली कच्ची पपई फळे निवडून घ्या. त्यांची साल काढून विशिष्ट आकाराचे बारीक तुकडे करा. सलरहित विशिष्ट आकाराचे बारीक तुकडे २० टक्के मिठाच्या द्रावणात ३ ते ६ तासापर्यंत भिजवून ठेवा. पपईचे तुकडे द्रावणातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुकडे धुवून झाल्यानंतर १० मिनिटे पाण्यात उकळून घ्या. ५० डिग्री ब्रिक्स (रिफ्रॅक्टोमीटरने तपासणे) साखरेचे प्रमाण असलेला पाक बनवून घ्या. पाकात ०. २ ग्रॅम खाण्याचा रंग व ५०० - ७०० मीग्रॅ सायट्रिक आम्ल टाका. उकळलेले तुकडे ६ ते ८ तास पाकात भिजवून ठेवा. तुकडे असलेला पाक ६५ डिग्री ब्रिक्स साखरेचे प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवा व त्यात ५०० मिग्रॅ सोडियम बेन्झोएट टाका. आवश्यक तेवढे पाणी व साखर टाकून पाक ७० डिग्री ब्रिक्स साखरेचे प्रमाण होईपर्यंत शिजवा. पाकातील तुकडे वेगळे करून योग्यपद्धतीने वाळवून घ्या. पपईची टूटी - फ्रुटी हवाबंद पिशवीत साठवा.

 पपई गराची पोळी:

परिपक्व पिकलेली पपईची फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. फळांची साल व अनावश्यक भाग काढून मिक्सरमधून गर बनवून घ्यावा. बनवलेला गर मस्लिनच्या स्वच्छ कापडातून किंवा योग्य चाळणीतून गाळून घ्या. एक किलो गरामध्ये साधारणतः १५० ते २०० ग्राम साखर व ५ ग्राम सायट्रिक आम्ल मिसळून १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवा. शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरवून वळवण्यासाठी ठेवा. वाळलेल्या पपई पोळीचे तुकडे करून पॅकबंद प्लास्टिक पिशवीमध्ये साठवा.

भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणके प्राधिकरणाने वरील पदार्थांसाठी ठरवून दिलेली प्रमाणके खालीलप्रमाणे:

अनु. क्र. पदार्थाचे स्वरूप फळाचा गर एकूण विद्राव्य घटक आम्लता

अशापद्धतीने अतिपुरवठा, कमी दर व अत्यल्प मागणी काळात खराब होणारी परिणामतः फेकून द्यावी लागणारी पपईची फळे वापरून त्यांचे मूल्यवर्धन करता येईल व शाश्वत नफा मिळवता येईल.    

                             धन्यवाद।    

                                         लेखक: ओमकार सुरेश देवगड़े



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?