शेती “ऑइल पाम”ची...!!!
शेती “ऑइल पाम”ची...!!! - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
ऑइल पामया वृक्षाला मराठीत “तेल माड” असे संबोधले जाते. सुमारे ६-२४ मीटर उंच, उपयुक्त, शोभिवंतआणिनारळासारखा हा सरळ वृक्ष.बहुवर्षीय पिकांपैकी सर्वात जास्त तेल उत्पादन देणारे पिक असल्याने “गोल्डन पाम” या नावाने संभूषण.ऑइल पाम हा मूळचा उष्ण कटिबंधीय, पश्चिम व मध्य आफ्रिकेतील असून तेथे तो जंगलात व समुद्रकिनारी आढळतो. ऑइल पामचे शाखाहीन खोड भरभक्कम असून त्यावर खोलगट वलये असतात. शेंड्याकडे संयुक्त व पिसासारख्या, मोठ्या, काटेरी देठाच्या भरपूर पानांचा झुबका असतो व प्रत्येकावर ५०-६०, तलवारीसारखी लांब, टोकदार व जाड दले असतात. शेंड्यांकडे पानांबरोबरच आखूड आणि जाड फुलोरे येतात. ते एकाच वेळी ३ ते ७ असून नर-फुलोरे प्रथम व स्त्री-फुलोरे नंतर येतात. फुले एकलिंगी व एकाच झाडावर असून त्यांची संरचना सामान्यपणेपामकुलात वर्णिल्याप्रमाणे असते. आठळीयुक्त फळे अक्रोडाएवढी, पिवळी, लाल, शेंदरी किंवा काळी आणि चकचकीत, लंबगोल, टोकदार असून त्यांची साल मांसल व त्यांत १–३ कठिण कवचाच्या बीया असतात. बियात पांढरा गरअसतो.
जगातील एकूण उत्पन्नाच्या फक्त १० टक्के पाम तेल इतर उद्योगांसाठी तसेच साबण उद्योगात कच्चा माल म्हणून वापरले जाते. इतर वनस्पती तेलापेक्षा पाम तेल स्वस्त असल्याने तसेच आरोग्य अपायकारक नसल्याने दिवसेंदिवस या तेलाचा वापर वाढत आहे. याचा अनेक खाद्य पदार्थांत वापर केला जातो.त्याचबरोबर साबण, सौंदर्यप्रसाधनातही वापर वाढतो आहे. हा वृक्ष अतिशय काटक व सहसा किडी-रोगांना बळी न पडणारा असल्याने यात आंतरपिके घेऊन उत्पादन वाढविणे सहज शक्य आहे. ऑइल पाम शेतीमुळे देशात आयात होणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी होऊन निर्यातीतून परकीय चलन उपलब्ध होऊ सहते. त्या दृष्टीने या फळपिकाच्या शास्त्रीय लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामान व जमीन :
उष्ण कटिबंधातील २५०० ते ४००० मिलिमीटर पाऊस व २० ते ३३ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.कमीत कमी ५-६ तास सूर्यप्रकाश व ८० टक्के आर्द्रता असेल तर या झाडाची अतिशय उत्तम वाढ होते.एकंदरीतच उबदार हवामानात ऑइल पामची वाढ चांगली होते.
ऑइल पामकुठल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते. तथापि, हलक्या ते मध्यम, कर्बयुक्त व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमीनीत या झाडाची चांगली वाढ होते.ऑइल पामच्या जमिनीची खोली लागवडीसाठी कमीत कमी १ मीटर असावी. क्षारपड व रेदाड जमिनीमध्ये याची लागवड करणे टाळावे.
सुधारित जाती :
भारतीय वातावरणात अधिक उत्पादन देणाऱ्या ऑइल पामच्या तेनेरा, दुरा व पिसिफेरा या ३ जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत.
अभिवृद्धी व लागवड :
सर्वसाधारणपणे,ताज्या व पक्व फळांपासून मिळालेल्या बिया नवीन रोपे तयार करण्यास वापरतात. बिया लागवडी अगोदर ४-५ दिवस गरम पाण्यात भिजत ठेवाव्या म्हणजे त्या लावल्यानंतर १०-१२ दिवसात उगवून येतात. रोपवाटिकेमध्ये रोप तयार करून १२ ते १५ महिन्याचं रोप लागवडीसाठी वापरणे जास्त सोयिस्कर ठरत्ते. ऑइल पामच्या लागवडीसाठी९ मीटर अंतरावर ०·६ बाय०·६ बाय०·६ मीटर मापाचेखड्डेघेतात. रोपांची लागवड करतानाचांगले कुजलेले शेणखत, निचऱ्यासाठी थोडी वाळू व रासायनिक खताची एक मात्राखड्ड्यांमध्ये भरतात.
अन्न्यद्रव्ये व पाणी व्यवस्थापन :
ऑइल पामच्याझाडाला वर्षातून ४ वेळा म्हणजे प्रत्येक ३ महिन्यांनी समप्रमाणात खत द्यावीत. लागवड करताना पहिली मात्रा दिल्यानंतर खतांची दुसरी मात्रा देताना ७५-१०० किलो शेणखत आणि ५ किलो निंबोळीपेंड द्यावे. खत दिल्यानंतर पाणी द्यायला वासरू नये.
ऑइल पाम हे जरी कोरडवाहू, काटक फळपिक असले तरी व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्नासाठी झाडांना पुरेसे पाणी देणे गरजेचे असते. कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात ऑइल पामची लागवड करू नये. वाढीच्या महत्वाच्या काळात एका झाडाला २०० लिटर पाणी आवश्यक असते. ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी बचतीसोबत अधिक उत्पन्न काढणे शक्य आहे.
पीक संरक्षण :
ऑइल पामच्या झाडावर रोग व किडींचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी उंदरांपासून फळांचे नुकसान होते. उंदीर नियंत्रणासाठी येथील शेतकऱ्यांनी घुबडाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला आहे. शेतकरी पाम ऑइलच्या बागेत जमिनीपासून पाच फूट उंचीवर लाकडी पेटी उभारतात. या पेटीमध्ये दररोज घुबड येऊन वास्तव्य करतात. घुबड पक्षी उंदीर, साप खात असल्याने फळांचे उंदरांपासून संरक्षण होते. घुबडास दररोज किमान तीन किलो मटण लागते. बागेत उंदरांचा प्रादुर्भाव असल्याने दररोज एक घुबड १३ ते १७ उंदीर खाऊन टाकते. पाम झाडास भुंग्यांचा प्रादुर्भाव होतो. भुंगा झाडाचा गाभा खात असल्याने झाड कमकुवत होते. झाडावर भुंग्यांचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणाच्या बरोबरीने हे झाड तोडून टाकले जाते. झाड न तोडल्यास इतर झाडांवर भुंग्यांच्या प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. वेळोवेळी झाडाचे योग्य निरिक्षण करून कीड-रोग नियंत्रणासाठी शिफारशींनुसार उपाय योजना कराव्यात.
वेळोवेळी तण काढून बाग स्वच्छ ठेवावी. तण नियंत्रणासाठी शिफासशीनुसार रासायनिक औषधांचाही वापर करता येतो. ऑइल पामच्यालागवडीमध्ये दोन झाडातील अंतर जास्त असल्याने पहिले ३-४ वर्षे शीतप्रेमी पिके घेऊन उत्पन्न काढता येते. ऑइल पामच्या खोडाजवळून खोल नांगरट करणे टाळावे, तसेच उन्हाळ्यात जमिनीचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी वाळलेले गवत, नारळाच्या शेंड्या, इत्यादींचे आच्छादन करावे.
काढणी व उत्पादन :
साधारणपणे,ऑइल पामच्याझाडाला वयाच्या चौथ्या वर्षापासून फळे येण्यास सुरुवात होते.झाड ६ ते ७ वर्षांचे झाल्यावर भरपूर बहर येतो, ३० वर्षांनंतर तो कमी होत जातो व ६० ते ७० वर्षांनंतर तो संपतो. ऑइल पामच्या झाडापासून वर्षातून दोन वेळा फळांचे उत्पादन मिळते. झाडास फुले आल्यानंतर सहा महिन्यांत उत्पादन मिळते.योग्य वेळी फळांची काढणी करणे गुणवत्तेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. फळांच्या शेंदरी रंगावरून तेलाचा अंश भरपूर झाल्याचे समजतात व घोसातील ४-५ फळे अपोआप गळून पडल्यानंतर काढणी करतात. हाताने फळ दाबले तर त्याळून शेंदरी रंगाचे तेल बाहेर येते. काढणी करताना फळासोबत ४-५ सें.मी. देठ ठेवतात. काढणीसाठी धारदार चाकूचा वापर करतात. दोन काढणीमध्ये १० ते १४ दिवसाचं अन्तर ठेवतात.प्रत्येक वृक्ष त्याच्या दुप्पट वजनाची फळे देतो. एका झाडास ३ ते ७ फळाचे घोस येतात. एका घोसात १६०० फळे असतात. एका फळाचे वजन २५ ते ३०ग्राम भरते. एका तोड्याला एका घोसापासून सुमारे ४८ किलो फळे मिळतात. सरासरी पाच घोस धरल्यास एका झाडापासून एका तोड्यास २०० किलो, म्हणजे दोन तोड्यास वर्षाला ४०० किलो फळे मिळतात. पहिल्या आठ वर्षांपर्यंत एकरी ४ ते ५ टन तर दहा वर्षांनंतर ७ ते ८ टन उत्पादन मिळते. फळे तोडल्यानंतर २४ तासांच्या आत प्रक्रियेसाठी पाठवावी लागतात, अन्यथा फळे खराब होण्यास सुरवात होते.
उपयोग :
या वृक्षाच्या फळांपासून दोन प्रकारचे तेल मिळते. मांसल सालीपासून ३०–७०% पामतेल व बियांतील मगजापासून ४४–५३ टक्के पाम मगज तेल (पाम कर्नेल ऑईल) मिळते. या दोन्हींत काही फरक आढळतात. चांगल्या प्रतीच्या पाम तेलाचा रंग फिकट पिवळा ते गर्द नारिंगी असून चवदार व सुवासिक असते. समशितोष्ण प्रदेशात ते कमी अधिक घन असते, म्हणजे ते वनस्पतीजन्य मेदया सदरात येते. साबण, मार्गारीन, मेणबत्या व काही उद्योग (पोलाद व कथिलाच्छादित पत्रे) यांमध्ये त्याचा वापर मोठा आहे. बाजारात मिळणारे पाम तेलाचे प्रकार त्यातील मुक्त वसाम्लाच्या प्रमाणावर ठरविले असून अनेक देशांनी तेलातील अम्लांचे प्रमाण निश्चित केले आहे. पाम तेलात ‘अ’ जीवनसत्त्व कॉडलिव्हर तेलाइतके आणि लोण्यातील जीवनसत्त्वाच्या दहा पट अधिक असते. यामुळे त्याचा उपयोग ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या व्यक्तींना फार होतो. पाम मगज तेलाकरिता विशेषतः आफ्रिकेतून मगजाची निर्यात होते व ज्या देशात पेंडीचा उपयोग फार होतो तेथेच त्याची तेल गाळण्यास आयात करतात. हे तेल पातळ, पांढरे किंवा काहीसे पिवळट किंवा पिंगट असते. यालाही उत्तम खोबरेलाप्रमाणे काही गुणधर्म, सुवास व चांगली चव असते. मार्गारीन व साबण उद्योगात ते बरेच वापरले जाते. त्यातील स्टायरीन चॉकोलेटाकरिता उपयोगात असून विशेष शुद्ध केलेले तेल, औषधे, केशर्वधक तेले व सौदर्यप्रसाधने यांत वापरतात. युरोपात पेंड पाळीव जनावरांना खाऊ घालतात. तेल माडाच्या शेंड्यांना वा अपक्व फुलोऱ्याच्या दांड्यांना भोके पाडून ‘ताडी’ काढतात आणि त्यापासून आफ्रिकेत मद्यकिंवा साखर बनवितात. या झाडाच्या फांद्यांपासून लहान टोपल्या केल्या जातात. झावळ्यांचा वापर झाडू म्हणून केला जातो. तसेच जळणासाठीही झावळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
अतिशय फायदेशीर असणाऱ्या या फळपिकाची लागवड करण्याअगोदर बाजार व ऑइल पामचे तेल काढण्यासाठी जवळपास तेल गाळप व्यवसाय, ठिकाणाची उपलब्धता, इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्यात.ऑइल पामच्या रोपांसाठी कृषी विभागातील संबंधित कर्मचारी, शासकीय किंवा शासनमान्य रोपवाटिका, कृषी विद्यापीठ किंवा महाविद्यालय येथे संपर्क साधावा.
- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी. फळशास्त्र)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा