चहा ची माहिती
तसा चहाचा इतिहास नेमकेपणानं सांगायचा तर अवघडच आहे. कारण या पेयाचा नक्की उगम कधी झाला ते कोणालाच सांगता येणार नाही. जन्माच्या आख्यायिका मात्र भरपूर आहेत. त्यातली एक म्हणजे बोधिधर्म नावाच्या बौद्धभिक्षूच्या पापण्यापासून तो तयार झाला. दुसरं म्हणजे इ.स. पूर्व 2737 मध्ये शेन नुंग या चिनी सम्राटाच्या कारकीर्दित तो प्रथम प्यायला वगैरे. पण त्याची खरी नोंद आढळते ती ख्रिस्तपूर्व 350 वर्षांपूर्वीच्या एर या शब्दकोशात.तिथं चहाला औषधी वनस्पती गणलं गेले आहे. एकमात्र निश्चितकी चहाच्या उगमाचं श्रेय चिन्यांना जातं. तिथे सगळ्यात प्रथम चहा लोकप्रिय झाला. इतका की सातव्या आठव्या शतकाच्या सुमाराला त्यावर कर लावला. ही लोकप्रियता प्रचंड असावी. कारण आठव्या शतकात यू लू नावाच्या माणसानं चहावरचा चिंग नावाचा ग्रंथच लिहिला. त्यात अनेक तपशील होते. चहाचं झाड कसं लावावं, त्यांच संगोपन कसं करावं इथपासून ते प्रत्यक्षात तो कसा बनवावा इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती त्यात होती. म्हणजेच जगाला चहा हा शब्दही चीनने दिला. तिथल्या कॅन्टनीन भाषेत चहाला चा म्हणतात. इतकंच नव्हे तर टी हा इंग्रजी शब्दही मूळचा चिनी आहे. तिथल्या ऍमॉय भाषेत चहा म्हणजे टे.चहाच्या बाबतीत चीनचं नाव एवढय़ा घट्टपणे जोडलं गेलं होतं की, काही काळ इतर ठिकाणच्या त्याच जातीच्या वनस्पतींना लोक चहा समजेनातच. त्याची हकिकत मोठी गंमतीशीर आहे. इंग्रज भारतात आले. त्यांनी मॅन्चेस्टरच्या गिरण्यातलं कापड इथं आणलं. त्यामुळे इथल्या हातमागाच्या जाडय़ा भरडय़ा कापडाची मागणी घटली. या बेकार तरुणांना काहीतरी काम देणं जरुरीचं होतं. अन्यथा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. इंग्रज त्याच शोधात असताना आसाममधल्या जंगलात उगवणार्या वनस्पतीची पानं उकळून एक प्रकारचं पेय बनतं व स्थानिक माणसं ती आवडीनं पितात याचा शोध त्यांना लागला.
इंग्रजांनी ती वनस्पती मिळवली. आपल्या देशातल्या प्रयोगशाळेत पाठवली. तिथं निर्वाळा मिळाला. हा खरा चहा नव्हे. हे काहीतरी वेगळं आहे. असं व्हायचं कारण म्हणजे इंग्लंडमधल्या प्रयोगशाळांवर असलेला चीनच्या चहाचा पगडा ही गोष्ट 1828 ची. जवळ जवळ दहा वर्ष ही नकारघंटा चालू होती. मग 1838 साली प्रयोगशाळेच्या लक्षांत आलं. हा आसामी चहा. चीनच्या चहापेक्षा निराळा असला तरी त्याची लज्जत छान आहे. मग ते झटपट कामाला लागले. त्यांनी आसामच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात चहाची लागवड केली. ईस्ट इंडिया कंपनी आधीच वेगवेगळे व्यापार करत होती… तिच्याकडे चहाची मक्तेदारी आली. तिथून चहा इंग्लंडमध्ये आणि मग जगभर पसरला. आसाम व दार्जिलिंग इथल्या चहाचा जगात प्रसार होण्यामध्ये असा ईस्ट इंडिया कंपनीचा हात आहे.
त्याअगोदर सतराव्या शतकात युरोपमध्ये चहा पोचला होताच. चहा व्यापाराचं पहिलं श्रेय डचांना द्यायला हवं. त्यानंतर फ्रेन्च, पोर्तुगीज व सर्वात शेवटी इंग्रज या व्यापाराकडे वळले मात्र नंतर त्यांनी बाजी मारली. भारतीय चहानं इंग्लंडला वेड लावलं… आज इंग्लंडमध्ये चहाचा खप कॉफीच्या पाचपट आहे.अमेरिकेत मात्र चहा रुजला नाही. तिथं आजही कॉफी जोरात आहे. चहाच्या पंचवीस पटीनं जास्त कॉफी तिथं खपते, मात्र अमेरिकन मंडळी चहा गरम करून पीत नाहीत. त्यांना बर्फाच्या पाण्यात विरघळवलेला चहा म्हणजे आईस्ड टी आवडतो. एकूण चहाच्या खपाच्या ऐंशी टक्के वाटा आईस्ड टीचा आहे. यावरूनच त्यांची रुची लक्षात यावी.
अमेरिकेच्या चहाद्वेषाला आणखी एक कारण आहे. अमेरिकन लोकांमध्ये युरोपियनांविषयी असंतोष वाढत होता त्या काळची गोष्ट. अमेरिकन क्रांतीपूर्वीची युरोपियनांनी अमेरिकेत पाठवल्या जाणार्या मालावर भरमसाठ कर आकारायला सुरूवात केली होती. अमेरिकनांना ते मान्य नव्हतं.. हळूहळू अमेरिकन क्रांतीची बिजे पेरली जात होती. जनतेचा कल ओळखून इंग्लंडनं इतर मालावरचा कर उठवला, परंतु चहावरचा कर मात्र कायम ठेवला. त्याच्या निषेधार्थ बोस्टन बंदरात आलेल्या चहाच्या पेटय़ा तिथल्या व्यापार्यांनी समुद्रात फेकून दिल्या. हा सत्याग्रह पुढे इतिहासात बोस्टन टी पार्टी नावाने प्रसिद्ध झाला.
त्यानंतर अमेरिकन चहाचा द्वेष करू लागले. तो त्यांचा रोषत्यांनी आजही जपून ठेवला आहे. त्यामुळं जगभर लोकप्रिय असलेल्या चहाची अमेरिकेत मात्र चलती नाही
आज जगभरात अनेक देशात चहा पिकवला जातो. मध्य आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोपचा अल्प भाग आणि अर्थातच आशियामध्ये चहाचे मळे आहेत. किमान दीडशे से.मी. वार्षिक पाऊस पडणार्या ठिकाणीच चहाची लागवड होते. लागवड करताना ब्रिटीशांनी आसाममधली बरीच जंगलं साफ केली. इतर ठिकाणी जंगलतोड केल्यावर बुंधे आणि मुळं जाळली जातात. चहाच्या मळ्यासाठी जंगल साफ करताना झाडे जाळून चालत नाही. राखेनंजमीन अल्कली होते. चहाला ते मानवत नाही. त्याला जमिनीत आम्ल लागतं. म्हणून झाडं मुळासकट काढावी लागतात. एकंदरीत हे जिकीटरीचे काम. पण एकदा केलं की पुढची कित्येक वर्ष उत्पन्न मिळत राहतं म्हणून याला महत्त्व.तसं चहाचं झाड उंच वाढणार्यापैकी. छाटणी केली नाही तर सरासरी 16 मीटर वाढायला हरकत नाही. पण मग एवढय़ा उंचीवरचा कोवळा पाला काढणार कसा? शिवाय चहाची खरी गंमत कोवळ्या पानांमध्ये आहे. तशी भरपूर पानं मिळवायची तर छाटणी हवी. आज जगभर चहाच्या झाडांची झुडपं दिसतात ती छाटणीमुळं “कमरेपेक्षा जरा जास्त उंची असलेल्या झाडामधल्या कोवळ्या पानांची खुडणी करायला सोपं जातं आणि खुडणी झाल्यावर बाजूला नवा अंकूर उगवतो. अशाप्रकारे एकाच झाडापासून भरपूर चहा मिळत राहतो.खुडलेली पानं तशीच्या तशी वाळवली तर त्यांचा कचराच होईल.म्हणून प्रथम ती थोडी कोमेजवतात. कोमेजलेल्या पानांना पीळ दिला जातो. मग ती बारीक कापून सुकवली जातात. हीच आपली चहा पावडर, चायपत्ती हा हिन्दी शब्द जास्त योग्य वाटतो. हे काम तसं वेळखाऊ आणि किचकट!
ब्रिटन त्या काळात यंत्रसामुग्री बनवण्यात अग्रेसर होते. त्यांनी यासाठी एक यंत्र बनवले.. त्यात बनलेला चहा तो सी.टी.सी. आजही भारतात सी.टी.सी. चहा सगळ्यात जास्त विकला जातो. अशाचप्रकारे तंत्रज्ञानात थोडा थोडा फरक असलेले ममटरी, डस्ट, वगैरे चहा बाजारात मिळतात. हे सगळे काळा चहा या प्रकारात मोडतात.
आपण विकत घेतो त्या चहाच्या किमती कमी जास्त का? हजारो रुपये किलोचे चहादेखील बाजारात असतात असे का? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. समुद्र सपाटीपासून जेवढे उंच जावे तेवढी चहाच्या झाडाची वाढ कमी होते, झाडाला नवे कोंब यायला वेळ लागतो, परंतु त्या कोंबापासून तयार होणारा चहाचवीला उत्कृष्ट असतो. तुटपुंजं उत्पन्न आणि मागणी फार यामुळं हा चहा महाग होतो. दार्जिलिंग टी जगात स्वादासाठीचांगलाच मान्यता पावला आहे. त्यामुळं त्याची किंमत हजारोंच्या घरात जाते. शिवाय चांगला स्वाद मिळावा म्हणून चहा बनवणार्या कंपन्या अनेक बागांमधून आलेल्या चहाच्या पानांचे मिश्रण करतात. त्या मिश्रणाचे प्रमाण हे गुपित असते. लिप्टन, ब्रूक बॉन्ड, डंकन, वाघबकरी चहांच्या कंपन्या त्यांच्या स्वादासाठी प्रसिद्ध झाल्या त्यामागे हेच कारण आहे त्यांच्याकडे अशी अनेक गुपितं आहेत. इतक्या प्रकारचा चहा बाजारात येण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा चहा अवडतो हे खरं आहे. शिवाय लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करून पितात. गुणधर्माच्या दृष्टीनं आपण पितो तो ब्लॅक टी, या व्यतिरिक्त उलाँग चहा,ग्रीन टी, व्हाईट टी, येलो टी, लेंपरे टी, झटपट तयार होणारा इन्स्टंट टी, सुवासिक चहा असे मूलभूत प्रकार जगात मिळतात. काही प्रकार फक्त विशिष्ट ठिकाणीच तयार होतात. तर काही विशिष्ट प्रकारे प्रक्रिया करून बनतात. उदाहरणार्थ उलाँग हा तिबेटमध्ये बनतो, याला विशिष्ट स्वाद असतो आणि तो अमेरिकेत चांगलाच खपतो.
लेंपेग टी मध्ये झाडाची हिरवी पानं जमिनीत पुरतात आणि काही काळानंतर बाहेर काढतात. काही भागात याचं लोणचंही बनवतात आणि काही ठिकाणी या लेंपेग टीच्या पानांची भाजीदेखील करतात. सुवासिक चहा बनवताना वाळवल्या जाणार्या चहाच्या पानांच्या थरांवर गुलाब, मोगरा, जाई, जुई अशा फुलांचे थर पसरतात. त्यांचा वास पानात उतरतो. मग पुढची प्रक्रिया करताना फुलं काढून टाकतात. इस्टंट चहा म्हणजे अगोदर तयार केलेल्या चहामधला पाण्याचा अंश काढून टाकून बनवलेली भुकटी यात प्रथम घरी करतो तसा चहा तयार करून मग त्यातले पाणी काढून घेतात. जितकी प्रक्रिया जास्त तितका चहा महाग हे साधं समीकरण आहे.इथे हर्बल टी आणि आपल्या गवती चहाविषयी थोडंसं लिहिलं पाहिजे. चहाची भुकटी न घातलेल्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या काही वनस्पती एकत्र करून हर्बल टी बनतो. मुळात हा चहा नव्हेच. केवळ बनवण्याची कृती चहासारखी असल्यानं त्याला चहाचं उपनाम जोडलं आहे. इतकंच काय ते गवती चहाचेही तसेच ही वनस्पती `तृष्ण’जातीची. संस्कृतमध्ये तिला गंधतृण असंच नाव आहे. हर्बल टी काय किंवा गवती चहा काय त्यापासून तयार होणारे हे काढे. चहा प्रकृतीला उत्तम असल्यानं मान्यता पावले. गवती चहामुळं सर्दी, खोकला कमी होतो. हर्बल टीमध्ये शरीराला उपकारक अशी अनेक द्रव्य असतात. अशाच काही वेगळ्या वनस्पतींचे मिश्रण नियमित चहात करून रोझलीप टी, चॅमोमिली टी असे हर्बल टीचे निराळे प्रकारही बनवले जातात. चायनीझ हॉटेलमध्ये मिळणारा चायनीझ टी हासुद्धा एक प्रकारचा हर्बल चहाच आहे.यात विशिष्ट वनस्पतीची पानं गरम पाण्याच्या किटलीत टाकतात. पानांचा अर्क पाण्यात उतरतो. तोच आपण पितो.
आपल्या रोजच्या चहातही औषधी गुण असल्याचं सांगितलं जातं. चहात कॅफेचिन नावाची रसायनं असतात. त्याशिवाय थिओब्रोमीन, थिओफायलीन हेसुद्धा असतात. चहाच्या पानांमध्ये सुमारे 700 रसायनं असल्याचा दावा केला गेला आहे. चहानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅन्सर होत नाही. दाताचे विकार होत नाहीत. हृदयाला फायदा होतो असे म्हटले जाते. इतर गोष्टींचे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु ग्रीन टीमध्ये ऑर्न्ट ऑक्सिटन्टस् भरपूर असतात. त्याचा शरीराला फायदा होतो एवढे नक्की. आपण पितो तो काळा चहासुद्धा तसा लाभदायक, फक्त कमी उकळला गेला तरच.फार उकळल्यावर त्यात टॅनीन उतरतं आणि हे टॅनीन शरीराला अपायकारक असतं.म्हणून चहा करायची पद्धत विशिष्ट हवी. प्रत्येक प्रकारच्या चहामध्ये ती वेगळी असते. प्रथम पाण्याला उकळी येऊ द्या. मग त्या पाण्यात चहापावडर घाला. चहापत्ती घातल्यावर ढवळता नये. कडक चहा म्हणजे जास्त उकळायला हवा हे समीकरण बरोबर नाही. त्यासाठी चहापत्ती जास्त घालावी. अशाप्रकारे तयार केलेल्या चहात मूळ स्वाद मस्तपैकी उतरतो. टी बॅग्ज वापरतानाही त्या पिळू नयेत. हलकेच बुडवलेल्या टी बॅग्ज चहाची लज्जत जशीच्या तशी पाण्यात उतरवतात. प्रत्येक प्रकारचा चहा किती काळ पाण्यात मुरू द्यायचा हे ठरलेलं असतं. त्याप्रमाणे कृती केली की स्वादचांगला मिळतो. पाण्याचं तापमानही ठराविक असलं पाहिजे. आपला काळा चहा नव्वद-पंच्याण्णव डिग्री फॅ.ला उत्तम स्वाद देईल व त्यासाठी गरम पाण्यात तो दोन ते तीन मिनिटं मुरत ठेवला पाहिजे. साखर आणि दूध चवीनुसार नंतर घालायच्या वस्तू आहेत.
आपल्याकडे आपण भरपूर उकळलेला साखरेचा अर्क असलेला चहा पितो. तो शरीराला बर्यापैकी अपायकारक आहे. मसाला चहादेखील गरम मसाळ्यांच्या पावडरीसोबत चहाची भुकटी उकळून बनवतात.गळ्यात आल्हाददायक वाटला तरी चहा म्हणून त्याची उपयुक्तता कमी झालेली असतेच. इन्स्टंट चहाच्या बाबतीत ही भीती नाही. गरम पाण्यात घातल्यावर काही सेकंदात तो तयार होतो. काही मंडळींना अमेरिकन लोकांसारखा आईस्ड टी आवडतो. बर्फाच्या पाण्यात चहापत्ती घालून तयार केलेला चहा प्रकृतीला चांगला असं काहीचं मत आहे. अर्थात यातलं काहीच पूर्णतः सिद्ध झालेलं नाही. जगभरातले लोक वेगवेगळ्या प्रकारे चहाचा आस्वाद घेतात. युरोप, जपान, चीनमध्ये चहात दूध घालत नाही किंवा फारच कमीदूध वापरतात. जपानमध्ये चा शिन्सू नावाचा चहापानाचा विधी असतो. ही परंपरा सोळाव्या शतकापासूनची. चीनमध्येही असाच प्रकार आहे. चा शिन्सू हा प्रकार फार मजेशीर आहे. त्यात बनवलेल्या दालनाचा दरवाजा अगदी लहान उंचीचा असतो. गुडघ्यावर वाकूनच त्यात प्रवेश करता येतो. चहाच्या स्वादापुढे गुडघे टेकावेत असा या विधीच्या जनकाचा उद्देश असावा. रशियात चहाच्या पाण्यात लिंबू पिळतात. तिबेटी चहा तर खासच पोकळ बांबूमध्ये ही मंडळी चहापत्ती, मीठ, लोणी आणि गरम पाणी घालून जोरजोरात हलवतात आणि मग गाळून पेल्यात ओततात. पोलंडमध्ये फक्त गरोदर स्त्रियांना दूध घातलेला चहा देण्याचा प्रघात आहे. पाकिस्तान, भारत, काश्मिरमध्ये जून चाय हा प्रकार आढळतो. हा चहा गुलाबी रंगाचा असतो आणि त्यात पिस्ते, दालचिनी घातलेली असतात. इंग्लंडमध्ये आसामी टी असेल तर जास्त पत्ती वापरावी आणि दार्जिलिंग असेल तर कमी असा संकेत आहे. उत्तर आफ्रिकेत चहाच्या पेल्यापासून बर्याच उंचीवर किटली धरून चहा पेल्यात ओतण्याची पद्धत आहे. त्याने पेल्यावर मस्त फेस येतो. मलेशियात याच प्रकाराला तेह तारीख म्हणतात. तोही उंचावरून ओतला जातो. शिवाय त्यात आटवलेलं दूध-कन्डेन्स्ड् मिल्क घालतात. मलेशियात तर चहा एकमेकांच्या ग्लासात ओतत नाचही केला जातो. या सगळ्या पूर्व आशियाई देशांमध्ये चहा छोटय़ा कपात मिळत नाही. चांगला टंबलटच्या आकाराचा पेला असतो. एकावेळी एका माणसाला पूर्णपणे प्यायला होत नाही. उलाँग चहा चक्क मिनरल वॉटरमध्ये बनतात. मिनरल वॉटरचे क्षार त्या चहाला लज्जत आणतात असे त्यांना वाटते. मालीतला गन पावडर चहा आणखी मजेदार. एकच चहाची पत्ती तीन वेळा उकळून त्यातला अर्क ते पाहुण्यांना देतात. म्हणजे चहा तीन वेळा घ्यायचा. प्रत्येक वेळी साखरेचं प्रमाण वाढतं.
आता लोक नुसता चहा घेत नाहीत. त्यात बर्याच गोष्टी घालतात. वेलची,गरम मसाला, आलं, कांदा, लिंबू या आपल्याला ज्ञात गोष्टी याखेरीज गुलाबाच्या पाकळ्या, मध, गूळ, काकवी, नुसती दुधावरची साय घालणारी मंडळी आहेत. हा ज्याच्या त्याच्या चवीचा प्रश्न आहे. चहाची पावडर विकत घेताना जपून खरेदी करावी, कारण यात भेसळही भरपूर होते. वापरलेली चहापत्ती पुन्हा वाळवून त्यात कृत्रिम रंग, कात, हळद मिसळून विकली जाते. काहीवेळा चहापत्तीचं वजन वाढवायला तीत वाळू, खायचाचुना मिसळतात. काही ठिकाणी अगस्तासारख्या झाडाची पानं घुसडून देतात. चहाच्या झाडाच्या देठांना फारशी चव नसते. त्यांचा भुगा करूनही चहात मिसळून दिला जातो. उडीद काळे त्यांची सालपट ही चहापत्तीत मिसळणारे कमी नाहीत. या भेसळखोरांपासून आपण सावध राहिलं पाहिजे एवढं नक्की. चला… मस्त थंडीत, सकाळी सकाळी वर्तमानपत्राची पुरवणी वाचता वाचता तुमच्या हातातही गरमागरम चहाचा कप असेलच.. त्या चहाची आज तुम्हाला जरा जवळून ओळख झालीय. आता म्हणायला हरकत नाही.. चाय गर्रम्….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा