कोरोना : ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय?
कोरोना : ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय?
ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू का म्हणतात, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण कोरोना विषाणूच्या साथीनं प्राणवायू किती महत्त्वाचा आहे पुन्हा आठवण करून दिली आहे.
रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे सध्या भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आणि मंगळवारी फेसबुकद्वारा जनतेशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला हवाई मार्गे ऑक्सिजन पुरवठ्याविषयी विनंती केली असल्याचं सांगितलं.
पण परिस्थिती नेमकी किती दाहक आहे? ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये काय अडचणी असतात आणि मुळात ऑक्सिजनचा कोव्हिडच्या रुग्णांना काय फायदा होतो?
महाराष्ट्रात ऑक्सिजनची टंचाई केवढी मोठी?
महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात दररोज साधरण 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. वैद्यकीय तसंच औद्योगिक कारणांसाठी हा ऑक्सिजन वापरला जातो.
सध्या कोव्हिडची साथ बघता राज्यातला 100 टक्के ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या दिवसाला 950 ते 1000 टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असूनही आतापासूनच राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे.
राज्यातली वाढती रुग्णसंख्या पाहता येत्या काही दिवसांत आणखी ऑक्सिजनची गरज निर्माण होईल, हे वास्तव आहे. तज्ज्ञांच्या मते पुढच्या काही आठवड्यांत महाराष्ट्राला दरदविशी 1500 ते 1600 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो.
पण ऑक्सिजनची ही वाढीव मागणी पुरी करणं सोपं नाही.
ऑक्सिजनची निर्मिती कशी होते?
हवेत मुबलक प्रमाणात (जवळपास 21 टक्के) ऑक्सिजन असताना, त्याची निर्मिती कशी केली जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामागची वैज्ञानिक प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे.
पण शास्त्रीय संज्ञा बाजूला ठेवून अगदी थोडक्यात सांगायचं, तर दबावाखाली द्रवात रुपांतर केलं जातं. अशा द्रवीकृत हवेतले घटक वेगळे करणं सोपं जातं. त्यातून शुद्ध आणि द्रवरुपातला ऑक्सिजन किंवा नायट्रोजन मिळतो.
हा द्रवीकृत म्हणजे लिक्विफाईड ऑक्सिजन रंगानं फिकट निळा असतो आणि अतिशय थंड असतो. त्याचं तापमान उणे 183 अंश सेल्सियस एवढं कमी असतं. अशा अतिथंड वायूंना 'क्रायोजेनिक गॅसेस' म्हटलं जातं.
हे तापमान कायम राखणं हे आव्हान असलं, तरी द्रवरुपात अशा वायूची साठवणूक आणि वाहतूक करणं सोयीचं असतं. त्यासाठी हा द्रवीकृत ऑक्सिजन सिलिंडरमध्ये दबावाखाली भरला जातो.
भारतात हे काम करणारे 500 कारखाने आहेत. पण त्यातून निर्माण होणारा सगळाच ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जात नाही.
कोव्हिडची साथ येण्यापूर्वी भारतात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपैकी 15 टक्के ऑक्सिजनच वैद्यकीय उपचारांत वापरला जायचा. बाकीचा ऑक्सिजन तेलशुद्धिकरण प्रकल्पांमध्ये किंवा लोहउद्योग, कार निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी वापरला जायचा.
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद होते त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होत राहिला. पण लॉकडाऊन उठल्यावर नंतर उद्योगांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत गेली. तरीही प्राधान्य रुग्णालयांना दिलं जातंय.
सध्या देशात प्राथमिक अंदाजानुसार निम्म्याहून अधिक ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जातो आहे.
आता मागणी वाढल्यावर ऑक्सिजनचे नवे कारखाने असे लगेच उभे करणंही शक्य नाही. शिवाय केवळ ऑक्सिजनची निर्मिती वाढवून चालत नाही, त्याची ने-आण कशी होणार हाही प्रश्न आहे.
ऑक्सिजनच्या वाहतुकीतील आव्हानं
भारतात ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतून टँकरद्वारा ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
काही ठिकाणी टँकर थेट हॉस्पिटलपर्यंत आणला जातो आणि मग पाईपद्वारा ऑक्सिजन प्रत्येक बेडपर्यंत थेट पोहोचवला जातो.
तर काही ठिकाणी रिफिल प्लांटमध्ये म्हणजे छोट्या कारखान्यांत हा टँकरद्वारा आलेला ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरला जातो आणि मग ते सिलिंडर्स रुग्णालयांत पुरवले जातात. पण अशा ठिकाणी सिलिंडर वारंवार बदलावे लागू शकतात.
वाचायला ही व्यवस्था सोपी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करताना अनेक नियम पाळावे लागतात.
लिक्विड ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि त्यामुळे काही अपघात होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी लागते.
त्यासाठी विशिष्ट प्रकारचे क्रायोजेनिक टँक आणि ते नेऊ शकतील अशा ट्रकचाच वापर होतो. भारतात असे साधारण पंधराशे ट्रक असल्याची माहिती ऑल इंडिया इंडस्ट्रीयल गॅसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं दिली आहे.काही आजारांमध्ये किंवा एखाद्या सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुप्फुसात वाढला, तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशा वेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही.
रुग्णांना मग शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काही आजारांत त्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत घेतली जाते. हे मशीन हवेतून ऑक्सिजन शुद्ध करून रुग्णांना पुरवतं आणि ते वापरणं तुलनेनं सोपं असतं.
पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तेवढा ऑक्सिजन कोव्हिडच्या रुग्णांसाठी पुरेसा नसतो आणि त्यांना सिलिंडरनं किंवा पाईपनं होणार्या ऑक्सिजनची गरज असते. तरीही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरनं कोव्हिड रुग्णांना काही मदत होते आहे का, याची माहिती राज्याचा अन्न आणि औषध विभाग घेत आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. रुग्णाला यंत्रानं किंवा सिलिंडरनं ऑक्सिजन घेण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय डॉक्टरांनाच घेऊ द्यायला हवा. कारण शुद्ध स्वरुपातल्या ऑक्सिजनमुळे काही अपघातही होण्याची शक्यता असते.
महाराष्ट्रात ऑक्सिजन वाहतुकीत काय अडचणी आहेत?
महाराष्ट्रात मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा मोजक्याच ठिकाणी द्रवरुपातील ऑक्सिजन तयार केला जातो. पण तिथून तो इतर शहरांमध्ये पोहोचवण्यास वेळ लागतो.
ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कारखान्यात एक टँकर भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे अनेकदा कारखान्याबाहेरच रिकाम्या टँकर्सना रांगेत उभं राहावं लागतं.
टँकर भरल्यावर तो वेगानं चालवता येत नाही. अशा टँकर्सच्या वाहतुकीवर प्रतितास 40 किलोमीटरची वेगमर्यादा घालण्यात आली आहे. तसंच रात्री अपघातांची संख्या जास्त असल्यानं दहानंतर हे टँकर्स प्रवास करत नाहीत.
राज्यात पुण्यासारख्या ठिकाणी प्रशासनानं ऑक्सिजनच्या टँकर्सना अँब्युलन्ससारखा दर्जा दिला होता. म्हणजे वाहतूक कोंडी झाली तर या गाड्यांना प्राधान्यानं पुढे जाता येईल.
पण असे उपाय करूनही नांदेडसारख्या शहरांमध्ये तर हे टँकर्स पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती स्थानिक पत्रकार योगेश लाटकर देतात.
"ऑक्सिजन टँकर्सना नांदेडपर्यंत पोहोचण्यासाठी तळोज्याहून 25 तास, पुण्याहून 18 तास, नागपूरहून 15 तास एवढा वेळ लागतो आहे. इथे ऑक्सिजनचा टँकर आला की तो सिलिंडरमध्ये भरण्यासाठी लगबग सुरू होते. अगदी दुष्काळी भागात पाण्याचा टँकर भरल्यावर जे दिसतं तसंच हे दृश्य दिसतं."
नांदेडमध्येच ऑक्सिजन रिफिल प्लांटचे मालक गणेश भारतीय सांगतात "आम्ही दिवसाला 150 ते 200 सिलेंडर्स भरून विकायचो. आता ही मागणी रोज 500 ते 600 सिलेंडर्सवर गेली आहे. उद्योगाला जाणारा ऑक्सिजन पुरवठा आता बंद केला आहे आणि सगळे सिलेंडर्स रुग्णालयांत जातायत."
नेहमीपेक्षा अनेक तास जास्त काम करावं लागत असून मागणी पूर्ण करताना दमछाक होत असल्याचं ते सांगतात. तसंच उत्पादन आणखी वाढवायचं असेल तर आपल्यासारख्या पुरवठादारांना काही महिने लागू शकतात असंही ते सांगतात.
त्यामागचं मुख्य कारण म्हणजे भांडवल, सिलिंडर्सची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव. द्रवरूप ऑक्सिजनची हाताळणी करण्यासाठी, किंवा हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा करण्यासाठी कौशल्याची गरज असते.
मात्र अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा सराव नसल्यानं किंवा पुरवठ्याच्या प्रक्रियेत गळती झाल्यानं वीस टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन वाया जात असल्याचं निरीक्षण अन्न आणि औषध विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवलं आहे.
हवाई वाहतूक आणि अन्य पर्याय
महाराष्ट्रात टंचाई जाणवू लागल्यावर गुजरात, कर्नाटक अशा शेजारच्या राज्यांतून काही प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. पण ही राज्यही रुग्णसंख्या वाढत असल्यानं आता हा पुरवठा थांबवू शकतात.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिल्याचं पीटीआयचं वृ्त आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाया जाणार नाही, यावर आता शासनाचा भर राहील.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मदत मागितली असून, हवाई वाहतुकीचा पर्याय आणि लष्कराची मदत देण्याची विनंतीही केली आहे.
यासंदर्भात आम्ही ऑल इंडिया गॅसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिक्कू यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवायचा यावर सरकारशी आम्ही चर्चा करतो आहोत आणि लवकरच निर्णय घेतला जाईल.
कोव्हिड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा का गरजेचा?
एरवी आपण हवेतून श्वासावाटे ऑक्सिजन आत घेतो. हा ऑक्सिजन फुप्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचतो. तिथे ग्लुकोजसोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होते, म्हणजे अन्नाचं उर्जेत रुपांतर होतं. सजीवांच्या जगण्यासाठी ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे.
काही आजारांमध्ये किंवा एखाद्या सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुप्फुसात वाढला, तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशा वेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही.
रुग्णांना मग शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काही आजारांत त्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत घेतली जाते. हे मशीन हवेतून ऑक्सिजन शुद्ध करून रुग्णांना पुरवतं आणि ते वापरणं तुलनेनं सोपं असतं.
पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तेवढा ऑक्सिजन कोव्हिडच्या रुग्णांसाठी पुरेसा नसतो आणि त्यांना सिलिंडरनं किंवा पाईपनं होणार्या ऑक्सिजनची गरज असते. तरीही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरनं कोव्हिड रुग्णांना काही मदत होते आहे का, याची माहिती राज्याचा अन्न आणि औषध विभाग घेत आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. रुग्णाला यंत्रानं किंवा सिलिंडरनं ऑक्सिजन घेण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय डॉक्टरांनाच घेऊ द्यायला हवा. कारण शुद्ध स्वरुपातल्या ऑक्सिजनमुळे काही अपघातही होण्याची शक्यता असते.
Very good😊
उत्तर द्याहटवाOxygengas konta ranga cha cylinder madhi bhartat
उत्तर द्याहटवाLight blue
हटवा