मिरची लागवड तंत्रज्ञान

मिरची लागवड तंत्रज्ञान

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मिरची पिका बद्दल या लेखात माहिती करून घेणार आहोत. मिरचीही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याबरोबर ते एक उत्तम व्यापारी पीक आहे. भारतीय हवामानात मिरची हे पीक उत्तमरीत्या वाढते. आपल्या देशातील मिरचीची परदेशात निर्यात केली जाते. मिरची निर्यातीमध्ये आपला जगात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्र मधील मिरची लागवडीखालील एक लाख 40 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड,धुळे, चंद्रपूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, आणि अमरावती या जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रात मिरचीचे अनेक स्थानिक प्रकार आढळतात. उदाहरणार्थ लवंगी, संकेश्वरी, (कोल्हापूर) , वाल्हा( पुणे), मुसळवाडी( अहमदनगर ),देगलूर, धमीबादी (नांदेड), दोंडाईचा (धुळे) ,मलकापूर,(बुलढाणा) भिवापुरी (नागपुर )इत्यादी.

हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अ व क जीवनसत्व असतात.मिरची मध्ये असलेल्या कॅपसीन या रासायनिक द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. तर सुकलेल्या मिरच्यांना कॅपसीन या रंगद्रव्यामुळे लाल रंग येतो. मिरचीच्या भुक्तिमध्ये जास्तीत जास्त 1.5 टक्के तिखटपणा असतो.
मिरचीसाठी जमीन
मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरची पिकास योग्य असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते. साधारणपणे 75 सेंटीमीटर पाऊसमान असलेल्या भागात ओल धरून ठेवणाऱ्या कळया कसदार जमिनीत कोरडवाहू मिरचीचे पीक चांगले येऊ शकते.

मिरचीसाठी हवामान
मिरचीसाठी उष्ण व दमट हवामान लागते. या हवामानात मिरचीची वाढ जोमाने होते व उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, हिवाळा ,आणि उन्हाळा या तिन्ही हंगामात करता येते. परंतु हिवाळी हंगामात 20 ते 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यासाठी 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. हंगामात तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेल्यास फुलांची गळ होऊन उत्पादनात घट येते.

मिरचीच्या जाती
मिरची च्या जातींची लांब तिखट मिरची आणि जाड कमी तिखट मिरची अशा दोन गटात विभागणी करता येते.

लांब व तिखट मिरचीच्या मुख्य जाती
बेडगी-
या जातीची मिरची 12 ते 15 सेंटिमीटर लांब असून कमी तिखट असते. पिकलेली फळे गडद लाल रंगाची असून सालीन वर सुरकुत्या पडतात. जिरायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे.

संकेश्वरी-
या जातीच्या मिरचीची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. मिरची 20 ते 23 सेंटिमीटर लांब असून तिखट असते. मिरचीच्या बेगडी जातीप्रमाणेच ही जात जिरायती लागवडीसाठी योग्य आहे.

एनपी 46- ए
पिकलेली फळे मध्यम लाल आणि गडद लाल रंगाची असतात. हिरव्या तसेच लाल मिरचीसाठी ही जात चांगली आहे. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य असून फुल किड्यांना प्रतिकारक आहे.

जी -3
या जातीची मिरची मध्यम आकाराची, लाल रंगाची, तिखट असते. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे.
उत्पादन मिळते. हिरव्या मिरचीच्या विक्रीसाठी ही जात योग्य आहे. या जातीची मिरची लांब आणि बारीक असते. पिकलेली फळे लाल रंगाची असून त्यावर सुरकुत्या असतात. अशा मिरचीला बाजारात जास्त मागणी असते. जातीपासून हेक्‍टरी सहा क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात.

पुसा सदाबहार-
मिरचीची ही जात अनेक वर्ष वाढणारे असून विषाणूरोग, चुरडा मुरडा, आणि किडींना प्रतीकारक आहे. एकदा केलेली लागवड दोन ते तीन वर्ष ठेवता येते. या जातीच्या मिरीचा लाल रंगाचा असून घोसात लागतात. एका झाडावर साधारणपणे 35 ते 40 घोस लागतात. या जातीपासून हेक्‍टरी 15 ते 20 टन ताज्या आकर्षक लाल मिरचीचे उत्पादन मिळते.

जवाहर मिर्च 218-
ही जात जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठात विकसित केली असून र हेक्‍टरी 7.5 टन पिकलेल्या लाल मिरचीचे उत्पादन मिळते. वाळलेल्या मिरचीचे 1.7 टन उत्पादन मिळते.

पंत सी 1-
या जातीची मिरची सहा ते सात सेंटिमीटर लांब असून खूप तिखट असते. याशिवाय ही जात चुरडा मुरडा आणि मोझाइक या रोगांना कमी बळी पडते. दर हेक्‍टरी 4.5 क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात.

कोकण कीर्ती –
या जातीची झाडे बुटकी 60 ते 70 सेंटिमीटर उंच आणि आटोपशीर असतात .ही जात दापोली कृषी कोकण विद्यापीठाने विकसित केली असून पीक तयार होण्यास साधारणतः 120 ते 130 दिवस लागतात. या जातीपासून हेक्‍टरी सरासरी 10 टन हिरव्या तर दोन ते तीन टन वाळलेल्या मिरच्यांचे उत्पादन मिळते.

लागवडीचा हंगाम-
मिरची हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतात .खरीप हंगामातील बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यापासून जून अखेर पर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी फेब्रुवारी मध्ये बियाणांची पेरणी करतात.

बियाणांचे प्रमाण-
मिरचीचा योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवण क्षमता असलेले, उत्कृष्ट दर्जाचे, अत्यंत खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. साधारणपणे हेक्‍टरी एक ते 1.25 किलो बी पुरेसे होते.

बियाणांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ते तीन ग्रॅम थायरम चोळावे. रोपवाटिका तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करावेत. बियाणांची पेरणी केल्यापासून चार ते सहा आठवड्यांनी आणि पंधरा ते वीस सेंटीमीटर वाढ झाली ही रोपांची लागवड करावी.

लागवड-
मिरची पिकाची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंच आणि पसरट वाढणार्‍या जातीची लागवड 75 बाय 60 किंवा 60 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर तर बुटक्या जातीची लागवड 60 बाय 45 सेंटिमीटर अंतरावर करावी.काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे .लागवडीपूर्वी एक दिवस आगोदर रोपवाटिकेत हलके पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची काढणे सुलभ होते. आणि रोपांची मुळे तुटत नाहीत. तसेच रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावेत किंवा जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावीत. त्याचप्रमाणे लागवडीपूर्वी रोपे विशेषतः पानाचा भाग पाच मिनिटात दहा ग्रॅम कुस्क्रोन+ 25 ग्रॅम डायथेन एम-45 +30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक दहा लिटर पाण्यात मिसळावे आणि या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत. आणि लागवड करावी. रोपांची लागवड शक्‍यतो सायंकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी पाणी द्यावे.

मिरची मधीलअंतरमशागत
आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे.जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

मिरची खत व्यवस्थापन-
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावे. मिरची पिकासाठी 100:50 :50 किलो नत्र , स्फुरद पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. आणि अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर चार ते सहा आठवड्यांनी म्हणजे फुल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन
पावसाळ्यात गरजेप्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळे गळण्याचा धोका असतो .म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू नये तसेच गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

मिरची कीड व रोग व्यवस्थापन
कीड नियंत्रण
मिरचीवर फुलकिडे, मावा, कोळी, या किडी आणि फळ कुजणे, फांद्या वाळणे, भुरी, बोकड्या किंवा चुरडामुरडा हे रोग येतात. या कीडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी खालील प्रमाणे एकत्रित उपाय योजना करावी.

नियंत्रणासाठी उपाय योजना
दहा लिटर पाण्यात 10 मिलिलिटर कार्बोसल्फान 25 टक्के अधिक 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक आणि 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 20 ग्रॅम थायरम या प्रमाणात मिसळून मिश्रण तयार करावे .या मिश्रणात रोपांचे शेंडे बुडवून रोपांची लागवड करावी.
रोपांच्या लागवडीपासून दहा दिवसाच्या अंतराने दहा लिटर पाण्यात 10 मिलिलिटर कार्बोसल्फान 25%आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची पिकावर फवारणी करावी.
या फवारणीनंतर दहा दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. त्याकरिता दहा लिटर पाण्यात 10 मिलिलिटर कार्बोसल्फान 25% आणि वीस ग्रॅम थायरम 80% मिसळून तयार केलेल्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी. याप्रमाणे झाडांना फुले लागेपर्यंत दहा दिवसांच्या अंतराने दोन किंवा तीन वेळा फवारणी करावी. झाडांना फुले लागल्यानंतर दहा दिवसाच्या अंतराने दहा लिटर पाण्यात 20 मिली लिटर malathion 50% किंवा 30 मिलिलिटर क्विनॉलफॉस 20 टक्के किंवा 20 मिलीलिटर फेनव्हेरलेट 3 टक्के अधिक वीस ग्रॅम थायरम या प्रमाणात मिसळून द्रावणाची पिकावर फवारणी करावी.

रोग नियंत्रण
रोपांची मर डंपिंग ऑफ
हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो.गादी वाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते.लागण झालेली रोपे निस्तेज आणि मळून होतात.रोपांचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात.त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते

उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 50 टक्के मिसळून हे द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळांभोवती ओतावे

फळे कुजणे आणि फांद्या वाळणे
हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो.या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिर्चीवर वर्तुळाकार खोलगट डाग असतात.दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात.

उपाय
या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा तसेच थायरम किंवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

भुरी
भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाय
भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक आणि 10 मिली लिटर karathen 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात.

काढणी
हिरव्या मिरच्यांची विक्री करण्यासाठी फळांची वाढ पूर्ण झाल्यानंतर तोडणी करावी.साधारणतः लागवडीपासून 40 ते 50 दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरुवात होते.मिरच्या वाळवून साठवायच्या असतील तर लागवडीपासून साधारण 70 ते 80 दिवसांनी मिरची तोडायला सुरवात करावी.

मिरचीचे उत्पादन
जिरायती पिकापासून हेक्टरी 7.5 ते 10 टन हिरव्या मिरचीचे उत्पादन मिळते.बागायती मिरचीच्या पिकापासून 20 ते 25 टन हिरव्या मिरच्या किंवा 2 ते 2.5 टन वाळलेल्या मिरचीचे उत्पादन मिळते.ढोबळी मिरचीचे दर हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?