ठिबक सिंचनामुळे शेती फायद्यात; पाण्यात ५० टक्के बचत! हे फायदे

ठिबक सिंचनामुळे शेती फायद्यात; पाण्यात ५० टक्के बचत! हे फायदे 

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर आजच्या स्थितीत वाढताना दिसतोय. ठिबकद्वारे पिकांना गरजेप्रमाणे व योग्य वेळी पाहिजे तेवढेच पाणी दिले जाते. पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकद्वारे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. दांडाने पाणी देण्याऐवजी ठिबक संचामुळे दुप्पट क्षेत्र पाण्याखाली आणता येते. विहिरीला मुबलक पाणी असले तरी विजेच्या लपंडावामुळे दिवसा सिंचन शक्य होत नाही. मात्र, ठिबक सिंचन पद्धतीमुळे शेतकरी रात्रीसुद्धा फक्त व्हॉल्व सुरू करून पिकांना ओलिताखाली आणू शकतो.

ठिबक सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात सरासरी २० ते ३० टक्के वाढ होते. शिवाय वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकमधून विद्राव्य खते पिकांना देता येतात. परिणामी, खतांची मुबलक मात्रा बसून पीक जोमदार येते. पिकांचा पक्व होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते. पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचे ठरल्यास जमिनीचे सपाटीकरण करावे लागते. कारण त्याशिवाय दांडातून पाणी पिकांपर्यंत पोचत नाही. मात्र, ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे, हा खर्च वाचतो. चढउताराच्या जमिनीवर फळझाडे लावता येतात.

ठिबक संचामुळे खतांमध्ये ३५ टक्के बचत
ठिबक संचाद्वारे फक्त पिकांच्या मुळाशी पाणी पोचते. त्यामुळे गवताची उगवण कमी होते. गाजरगवत, काँग्रेस गवत वाढत नाही. खते देण्याचाही खर्च ठिबकमुळे वाचतो. पाण्यात विरघळू शकणारी खते ठिबक संचातून दिली जातात. परिणामी, खतांचा सुयोग्य वापर होतो. विशेष खते हाताने दिल्याच्या तुलनेत ठिबकद्वारे दिल्यास ३०-३५ टक्के बचत होते. ठिबकद्वारे पाणी फक्त झाडाच्या बुंध्यापर्यंत पोचते. जमीन पूर्ण ओली होत नाही. त्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पिकांवरील रोगासह किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मजुराच्या खर्चात मोठी बचत होते. आज शेतकरी बांधव मजूर नसल्याने त्रस्त आहेत. ठिबकद्वारे कितीही क्षेत्र पाण्याखाली भिजवता येते आणि एकटा शेतकरी हे करू शकतो. अर्थात, मजुरांचा खर्च वाचविता येतो.
हलक्या जमिनीतही ठिबक संच उपयुक्त
पिकांना भरमसाठ पाणी दिले तर जमीन खारवट व चोपण होण्याची शक्यता असते. ठिबकद्वारे पाणी दिल्यामुळे जमिनी खारवट किंवा चोपण होत नाहीत. ठिबक संचाद्वारे मनुष्यबळ, इंधन व वीज कार्यशक्तीच्या खर्चात मोठी बचत होते. शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वादळवारा आला की शेतातील साहित्यावरही विपरीत परिणाम होतो. मात्र, वारा किंवा वादळाचा ठिबक संचावर काहीच परिणाम होत नाही. ठिबकच्या वापरामुळे पाणी वाया जात नाही. जमिनीची धूपही होत नाही. ठिबकद्वारे क्षारयुक्त पाणी पिकांना दिले गेले तरी जमिनीवर फारसा परिणाम जाणवत नाही. मर्यादित जमीन असेल तर ठिबकसारखी फायदेशीर पद्धत नाही. विशेषतः हरितगृहातील नाजूक पिके, फुलांसाठी ठिबक अतिशय फायदेशीर ठरतेय. निकृष्ट जमिनीतसुद्धा ठिबकद्वारे पीक घेणे शक्य होते.
ठिबक सिंचन पद्धतीसमोरील अडचणी
ठिबक सिंचन संच हा सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रारंभीचा भांडवली खर्च उत्पन्नापेक्षा जास्त वाटतो. ठिबकमध्ये पाणी देण्याच्या इतर पद्धतीपेक्षा व्यवस्थापन कुशलता जास्त असायला हवी. म्हणून, तांत्रिक माहिती असलेल्या प्रशिक्षित व्यक्तीकडून संच चालविण्याची व निगा कशी राखावी, याची माहिती घ्यावी. ठिबक संचामधून पिकांना देण्यात येणारे पाणी हे स्वच्छ व काडी-कचरा नसलेले असावे लागते. सूर्यप्रकाशामुळे ठिबकच्या नळ्या लवचिक होऊन खराब होण्याची शक्यत असते. शेतात जनावरांचा वावर असल्यास ठिबकच्या नळ्यांना धोका पोचतो. वरील मुद्दे लक्षात घेऊन ठिबक संचाची काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही आणि संच अनेक वर्षे सहज वापरणे शक्य होते.
ठिबक सिंचन पद्धतीच्या मर्यादा
सिंचन पद्धत कार्यरत ठेवण्यासाठी कायम कार्य तत्परता ठेवणे आवश्यक आहे. पिकांच्या मुळांशेजारी क्षारांची साठवण होते. पिकांच्या मुळांची ठराविक क्षेत्रात वाढ होते. प्लास्टिकच्या नळ्यांची यांत्रिकी खराबी होते. उंदराचा त्रासही असतो. यावर देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे, काही पिके अशी आहेत ज्यांना ठिबक संच उपयोग नसतो. उदाहरणार्थ भात पीक. भातासारख्या पिकांना ठिबक पद्धत वापरता येत नाही.

ठिबक सिंचन पद्धतीचे प्रकार
1)भूपृष्ठावरील ठिबक सिंचन (सरफेस पद्धत)
2)भूमिगत ठिंबक सिंचन (सबसरफेस पद्धत)
3)धार स्वरूपात ठिबक सिंचन (मायक्रोट्यूब)
4)सलग पट्टा ठिबक पद्धत
5)इनलाईन (ड्रिपर) पद्धत
ठिबक सिंचन पद्धतीचे वरील पाच प्रकारांत वर्गीकरण होते. ठिबक सिंचन पद्धतीचे वर्गीकरण करताना त्याची बसविण्याची पद्धत, पिकांचा प्रकार, वापरण्याची पद्धत हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

1)भूपृष्ठावरील ठिबक सिंचन (ऑनलाइन पद्धत)
सदरील पद्धतीत पीक तसेच फळझाडांच्या ओळीनुसार लॅटरल (वितरिका) जमिनीच्या पृष्ठभागावर पसरविल्या जातात. फळझाडांमधील अंतरानुसार आणि प्रत्येक झाडाची पाण्याची पद्धत गरज काढून लॅटरलवर बसवायच्या ड्रिपरची (तोट्या) संख्या ठरविली जाते. नवीन लागवडीवेळी झाडाजवळ एक अथवा दोन ड्रिपरचा वापर करावा. या प्रकारची पद्धत विशेषतः जास्त अंतराच्या फळबागा, पिकांसाठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये ड्रिपरमधून पाण्याचा वेग दर तासी चार ते १६ लिटरदरम्यान असतो. या पद्धतीमध्ये ड्रिपर बंद पडल्यास साफ करणे, अधूनमधून पाहणी करणे आणि जमिनीवर पाणी किती पसरते याचा अंदाज घेणे हे फायदे आहेत. झाडांची जशी वाढ होईल तसे प्रत्येक झाडाजवळ ड्रिपरची संख्या वाढवायला हवी.

2)भूमिगत ठिबक सिंचन
सदरील पद्धतीत मुख्यतः इनलाईन ड्रिपरचा वापर केलेल्या लॅटरल जमिनीत १५ सेंटीमीटर खोलीपर्यंत गाडतात. पाणी जमिनीच्या पृष्ठभागाखाली दिले जात असल्यामुळे बाष्पीभवनाचा ऱ्हास कमी होतो. यामुळे मुळांचा फक्त कार्यक्षम थरच भिजविला जातो. या पद्धतीमध्ये काही वेळा पिकांची मुळे ड्रिपरच्या छिद्रातून आत गेल्याचे आढळून आले आहे.

3)धार स्वरूपात ठिबक सिंचन (मायक्रोट्यूब)
काही फळझाडांच्या मुळांची रचना भिन्न असते. त्यामुळे ठिबकद्वारे पाणी देण्याच्या पद्धतीत थोडा बदल करून थेंब थेंब पाणी देण्याऐवजी बारीक धारेने बुंंध्याजवळ पाणी दिले जाऊ शकते. सदरील पद्धतीत पाणी लॅटरलद्वारे प्रत्येक झाडाच्या ओळीत वाहून नेले जाते. प्रत्येक झाडाजवळ लॅटरलला दुसरी लहान व्यासाची नळी (Microtube) बसवून पाणी झाडाजवळ सोडले जाते. झाडाजवळ पाणी सोडण्याचा वेग सुमारे २५ लिटर प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी असतो. या पद्धतीत पाणी देण्याचा वेग हा जमिनीत पाणी जिरण्याच्या वेगापेक्षा जास्त असतो. त्यामुळे पाणी साचून राहते. यासाठी छोटेसे आळे करावे. काही वेळाने जमीन तृप्त होऊन जाते. या पद्धतीत पूर्ण हवा बाहेर फेकली जाते व काही प्रमाणात मुळांवर हवेचा ताण पडतो. याचा खर्च कमी, देखभाल सोपी व वापरण्यास चांगली, सुटसुटीत आहे.

4)सलग पट्टा ठिबक पद्धत
पिकांच्या दोन ओळींसाठी एक लॅटरल वापरली जाते. लॅटरलवर ठराविक अंतरावर तोट्या बसविल्या जातात किंवा इनलाइन ड्रिपरचा वापर केला जातो. त्या वेळी लॅटरल या जमिनीखाली गाडल्या जातात. पाणी कमी वेगाने कायम जमिनीच्या पोटात कार्यक्षम मुळांच्या थरात सोडले जाते. या पद्धतीमुळे जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक रुंदीची पट्टी ओली राहते. या पद्धतीमध्ये खर्च कमी येतो.

5)इनलाईन (ड्रिपलाईन) पद्धत
इनलाईन पद्धतीमध्ये ड्रिपर हा लॅटरल तयार करताना लॅटरलच्या आत ठराविक अंतरावर जोडला जातो. यामध्ये दोन ड्रिपरमधील अंतर हे १०, २०, ३०, ५०, ६०, ७५, ९० आणि १०० सेंटीमीटर इतके असते. ड्रिपरचा प्रवाह हा २, ४, ८ लिटर प्रतितास इतका असतो. इनलाईन पद्धतीमध्ये ड्रिपरमधील अंतर व ड्रिपरचा प्रवाह निवडताना पिकाची पाण्याची गरज व जमिनीची पाणी धारण क्षमता विचारात घ्यावी लागते. या पद्धतीमध्ये ठिबक संच एकदा बसविल्यानंतर दोन ड्रिपरमधील अंतर बदलता येत नाही. पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. इनलाईनसाठी वाळूचा फिल्टर वापरणे व त्याची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे.

_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*आणि कृषिविषयक नवनवीन माहिती  साठी या https://omkaragri.blogspot.com/?m=1 ला भेट देेत रहा  
                               धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?