आणेल समृद्धी मत्स्यशेती !
आणेल समृद्धी मत्स्यशेती !
मत्स्यशेतीच्या पद्धती
एक जातीय मत्स्यसंवर्धन (मोनोकल्चर)
1) या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.2) या पद्धतीमध्ये तलावाचा आकार 0.2 ते 1.0 हेक्टर एवढा असतो.3) या प्रकारामध्ये कोळंबी जास्तीत जास्त 50,000 नग प्रति हेक्टर किंवा मासे 5,000 ते 10,000 बोटुकली प्रति हेक्टर या प्रमाणात संचयन केले जाते.
एकत्रित मत्स्यसंवर्धन (कंपोझिट फिश कल्चर)
1) या प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते.
2) या संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील, तर गवत्या मासा त्यांना खातो.
3) भारतीय कार्प साधारणतः वर्षामध्ये 800 ग्रॅम ते 1,000 ग्रॅम वाढतात, तर चायनीज कार्प 1,500 ते 2,000 ग्रॅमपर्यंत वाढतात. भारतीय व चायनीज कार्पसच्या संकरित जातीही उपलब्ध आहेत.
1) या प्रकारच्या संवर्धनामध्ये भारतीय व चायनीज कार्पबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबीचे (पोचा कोळंबी/ झिंगा) संवर्धन केले जाते. (तक्ता क्रमांक दोन पाहावा).
2) कोळंबी खालच्या थरात राहत असल्याने खाद्य व वावरण्यासाठी जागा यासाठी स्पर्धा होऊ शकते म्हणून मृगल व कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करू शकत नाही.
3) कोळंबी आठ महिन्यांमध्ये 60 ते 100 ग्रॅम वजनाची होते, मासे साधारणतः 500 ते 1500 ग्रॅमचे होतात.
4) बाजारपेठेतील आवकेनुसार माशांना साधारणतः 40 ते 60 रुपये प्रति किलो, तर कोळंबीला 350 ते 550 रुपये प्रति किलो दर मिळतो. या प्रकारामध्ये साधारणतः तीन ते चार टन प्रति हेक्टरी प्रति वर्ष मत्स्योत्पादन मिळू शकते.
5) या पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलावाचा आकार 0.5 ते 5.0 हेक्टर एवढा असतो. तलावामध्ये सोडण्यात येणाऱ्या मत्स्यबीजाची घनता 5,000 ते 10,000 प्रति हेक्टर आणि कोळंबी बीजाची घनता (पीएल- 15 ते 20) 20,000 ते 50,000 प्रति हेक्टर एवढी असावी.
मिश्र मत्स्य संवर्धनाकरिता आवश्यक असणारे मासळीचे गुणधर्म
1) संवर्धनाकरिता वापरलेले मासे आणि कोळंबीची जात जलद वाढणारी असावी.
2) संवर्धनाकरिता वापरलेले मासे वेगवेगळ्या स्तरांतील अन्न घटक खाणारे असले पाहिजेत.
3) संवर्धनाकरिता वापरलेले मासे परभक्षी नसावेत.
4) संवर्धनाकरिता वापरलेले मासे पूरक खाद्य आवडीने खाणारे असावेत.
5) माशांना बाजारामध्ये मागणी असावी, तसेच त्यांना बाजारभाव चांगला असावा.
6) मिश्र मत्स्यसंवर्धन करताना शक्यतो तलावात 50 ते 60 दिवस वाढविलेली कोळंबी मत्स्यबीजासोबत सोडावी.
7) गवत्या माशाचा संचयनाचा दर तलावातील वनस्पतीच्या घनतेवर अवलंबून असतो; तसेच पूरक आहार म्हणून गवत्या माशांसाठी विविध वनस्पती व भाजीपाला खाद्य म्हणून द्यावे.8) तलावातील पाण्यात कोळंबीला लपण्यासाठी टायरचे तुकडे, पाइप, माडाच्या झावळ्या यांचा वापर करावा.
9) तलावामध्ये कमीत कमी 10 महिने 1.2 मीटर ते 1.5 मीटर खोल पाणी राहायला पाहिजे.
10) मिश्र मत्स्यशेतीमध्ये मांगूर, सिंधी, पंगस यांसारखे भक्षक मासे टाळावेत.
मत्स्यशेती करताना :
पाणथळ, तसेच पडीक जमिनीतदेखील मत्स्यशेतीस खूप वाव आहे. मत्स्य व कोळंबीसंवर्धनाचे योग्य नियोजन केल्यास चांगला नफा मिळू शकतो. मत्स्यशेती करण्यासाठी जागेची निवड, पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.मत्स्य तलावासाठी पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता असणारी जमीन योग्य असते. या जमिनीत चिकण माती आणि गाळ यांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असावे. मत्स्य तलाव खोदताना ज्या ठिकाणी खोलगट जमीन आहे, अशी जमीन निवडल्यास तलाव खोदण्यास खर्च कमी येतो, तसेच क्षारपड जमिनीतही मत्स्य तलाव करता येतो. मत्स्यशेती सुरू करण्याकरिता प्रथमतः तलाव करणे आवश्यक आहे. तलावाचा आकार हा आयताकृती असावा. तलावाची लांबी रुंदीच्या दीड ते दोन पट असावी. तळे भरण्यासाठी गुरुत्वाकर्षणाने पाणी घेता यावे किंवा तलावात पाणी भरण्याची सोय असावी. नदी, विहीर, धरण, नाला किंवा कालवा यांतून विद्युत पंप/इंजिन बसवून पाणी तळ्यात घेता यावे, अशी सोय असावी. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपवर बारीक आसाची जाळी बसवावी किंवा गाळप कक्ष तयार करावा. पाणी घेण्याची व सोडण्याची व्यवस्था असावी. तलावामध्ये फक्त कोळंबीसंवर्धन करावयाचे असल्यास तळ्यातील तळातून पाणी काढून टाकता येईल, अशी व्यवस्था असावी. तलावामध्ये पाण्याची खोली सहा फूट असावी, अशा प्रमाणात किमान दहा महिने तरी पाणी उपलब्ध असावे. पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक ७.००पेक्षा कमी व ८.५पेक्षा अधिक नसावा. विद्राव्य प्राणवायू चार भाग प्रति दशलक्षपेक्षा (चार पीपीएम) अधिक असावा. पाणी स्वच्छ व प्रदूषणयुक्त हवे. तळ्यामध्ये जलवनस्पती, तसेच इतर झाडोरा असू नये.
तळ्यात पाणी घेतल्यावर बीजसंवर्धन सुरू करण्यापूर्वी पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक १५ ते २० दिवस अगोदर व्यवस्थित करून घ्यावा. २० गुंठे तलावाकरिता ४० ते १०० किलो या प्रमाणात चुन्याची मात्रा द्यावी. पाण्यात माशांचे नैसर्गिकरीत्या अन्न तयार होण्यासाठी तळ्याच्या आकारानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ओले शेण, युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे नैसर्गिकरीत्या अन्न तयार होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. तळ्यात शेवाळ वाढू लागल्यास युरियाचा वापर थांबवावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा