गुलाबी बोंड अळीसाठी करा उपाययोजना

गुलाबी बोंड अळीसाठी करा उपाययोजना

कपाशी पिकात सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.
 

कपाशी पिकात सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.

राज्यात दरवर्षी जवळपास ४२.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतांश कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे ३८.७४ लाख हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली. सध्या बहुतांश भागातील पीक पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत (४५ ते ६० दिवस) आहे. गुलाबी बोंड अळी ही कपाशीवरील अतिशय उपद्रवी कीड आहे. बीटी कपाशीला ती प्रतिकारक्षम बनल्यामुळे ४-५ वर्षांपासून प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान होत आहे. राज्याच्या काही भागात लवकर लागवड केलेल्या कपाशीवर मागील १२ ते १५ दिवसांपासूनच प्रादुर्भावाला सुरुवात झाली आहे. शिफारशीत वेळेत लागवड झालेल्या कपाशीवरही काही प्रमाणात प्रादुर्भावामुळे डोमकळ्या दिसून येत आहेत.

सर्वेक्षणात काय आढळले?
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे (सीआयसीआर) संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी मागील आठवड्यात शास्त्रज्ञांसह यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दौरा केला. त्यात ५० ते ६० दिवसांच्या कपाशीवर एक ते तीन टक्क्यापर्यंत डोमकळ्या आढळल्या. संस्थेच्या नागपूर येथील प्रायोगिक क्षेत्रावरही अलीकडेच डोमकळ्यांची नोंद झाली. शेतातील कामगंध सापळ्यामध्ये पतंग आढळून आले. यावरून चालू हंगामात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची चाहूल लागल्याचे निष्पन्न होते. सध्या हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र वाढता प्रादुर्भाव रोखून पुढील नुकसान टाळण्यासाठी संस्थेने शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वेळेत अवलंब करणे गरजेचे आहे.
उपाययोजना

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कपाशीचे पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत (४०-४५दिवस) असताना ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिलि अधिक नीम तेल ५ मिलि अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे अळीच्या पतंगाना अंडी घालण्यापासून रोखण्यास मदत होते. त्याचबरोबर सुरुवातीच्या वाढीच्या काळात रसशोषक किडींनाही प्रतिबंध होतो.
पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. त्यात अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी
प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. जेणेकरून पुढील प्रादुर्भाव रोखतायेईल. १० टक्के डोमकळ्या प्रादुर्भावग्रस्त फुले ही आर्थिक नुकसानपातळी आहे.

हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रॅंडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे अशी आहे.
उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी
मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासून (४५ दिवस) १५ दिवसांच्या अंतराने तीनदा प्रसारण करावे. त्यामुळे चांगले नियंत्रण मिळते.
जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.

कीटकनाशकांचा वापर 
(कीडनाशक मात्रा प्रति १० लिटर पाणी)
फवारणीची वेळ- पात्या लागण्याची अवस्था (पेरणीनंतर दिवस (४५ ते ६० दिवस)

५ टक्के निंबोळी अर्क अधिक नीम तेल ५० मिलि अधिक
अधिक डिटर्जंट पावडर) ५ मिलि अधिक १ गॅम
फवारणीची वेळ- फुलोरा ते बोंडे लागण्याची अवस्था (६० ते ९० दिवस)

क्विनॉसफॉस २५ टक्के एएफ २० मिलि
किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २० ग्रॅम
किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २५ मिलि
किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) ३० मिलि
कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी :
रसशोषक किडीचा उद्रेक टाळणे, किडीमध्ये प्रतिकारकक्षमता वाढीस लागू नये, फवारणी करणाऱ्या व्यक्तीस विषबाधा होऊ नये यासाठी पुढील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

पीक वाढीच्या सुरुवातीच्या ६० दिवसांपर्यंत गरज नसल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन) कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांपर्यंत वापर करू नये.
कीटकनाशकांचा वापर लेबल क्लेम तपासून करावा.
एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
त्वचेला इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हातांनी हाताळू नयेत. हातमोज्यांचा वापर करावा.
 श्‍वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाध होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा.
फवारणीचे तुषार डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे.

संपर्क ः डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५
(लेखक केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे शास्त्रज्ञपदी कार्यरत आहेत.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?