दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...

दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...
 
 आज  ८ मार्च जागतिक महिला दिन तेव्हा या जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण माता,भगिनी ,बंधू व सर्व देशवासीयांना कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) व कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम व माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ग्रामीण भारतातील शेतकरी महिला, ग्रामीण युवती एकदा जागृत व प्रज्वलित झाली की तिच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राची प्रगती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भगिनी माता आणि बंधुंनो 2001 च्या जनगणनेप्रमाण  ग्रामीण भागातील महिला साक्षरता दर साधारणता 31.6% आहे. कृषी किंवा शेतीमधील विविध विविध कामाचा विचार केल्यास साधारणपणे शेतीमधील जमीन तयार करण्याच्या कामात महिलांचा सहभाग 32%, पेरणी व शेत स्वच्छता मोहिमे मधील महिलांचा सहभाग 80 % टक्के, आंतरमशागतीच्या कामांमधील सहभाग 86% कापणी, मळणी उपननी, धान्य वाळवणे स्वच्छ करणे तसेच धन्याची साठवणूक करणे इत्यादी कामात 84% इतका महिलांचा सर्वसाधारण सहभाग असतो. याचाच अर्थ असा की शेतीच्या विविध कामातील महिलांचा सहभाग जवळजवळ  50 % ते 75 %  आहे. भगिनी माता आणि बंधुंनो या उलट या सर्व कामाकरता सर्वसाधारणपणे महिलांना मिळवणारे शेती कामातील आर्थिक योगदान पुरुषाच्या तुलनेत जवळजवळ 40% ते 50%  व कधीकधी त्यापेक्षाही कमी आहे.
       माता भगिनी व बंधुंनो ग्रामीण महिलांचा विचार केल्यास महिलांची भूमिका केवळ कृषी संदर्भात मर्यादित नाही तर ग्रामीण महिला ही बहुआयामी भूमिकेत कार्य करताना आढळून येते म्हणजे तिची भूमिका शेतीमधील कार्य, घरगुती दैनंदिन कार्य, मुलांचे संगोपन व पालन पोषण, शेतीपूरक व्यवसायातील तिची पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीच्या कार्याची भूमिका म्हणजे उदाहरणार्थ रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला किंवा फळबागा असतील तर त्यातील बारीक-सारीक गोष्टी मधील तिची दैनंदिन कार्यातील तसेच विक्रीतील भूमिका यांच्याकडे आपण डोळेझाक करूच शकत नाही. माता,भगिनी, बंधुंनो हे सगळं असलं तरीही महिला सक्षममीकरणातील  मूळ कळीचा मुद्दा म्हणजे महिलांचा शेती व शेती पूरक कार्यातील सहभाग जवळजवळ 50 ते 75 टक्के असला तरीही निर्णयक्षमतेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने आहे असे ठामपणे म्हणतात येईल का? सर्वसाधारणपणे पाहिल्यास कृषी मध्ये महिलांच्या निर्णयक्षमतेचा संदर्भातला सहभाग 15 ते 25 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आढळून येतो त्यामुळे  कृषी मध्ये किंवा शेती कामांमध्ये असलेल्या महिलांचा निर्णय क्षमतेमधील सहभाग वाढविणे गरजेचे आहे याकरिता सर्वसाधारणपणे ग्रामीण कृषी महिलांमध्ये असलेल्या ज्ञानात, कौशल्यात, चिकित्सक वृत्तीत व सकारात्मक दृष्टिकोनात कशी वृद्धी होईल याकरिता कृषी तंत्र प्रसार कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढविणे, कृषी मधील महिलांचे गट संघटन करून त्यांना शेतीमधील व शेतीपूरक व्यवसायातील विविध महत्त्वाचे निर्णय उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी, तांत्रिक कौशल्य अंगिकार करतानाचे महत्वाचे निर्णय, विकी व्यवस्थापनातील महत्वाचे निर्णय या संदर्भातील व या अनुषंगाने येणाऱ्या इतर बाबी संदर्भातील निर्णय पुरुषांच्या बरोबरीने घेता यावे याकरिता वाव दिला पाहिजे. यासाठी विविध माध्यमातून व कल्पकतेतून व कृतीतून ग्रामीण शेतकरी महिलेला प्रोत्साहित केले गेले पाहिजे. हे सगळे होत असताना कृषी व कृषिपूरक व्यवसाय मध्ये कृषी विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांनी प्रसारित केलेली विविध संशोधने उदाहरणार्थ शेतीमध्ये महिलांची श्रम वाचणारी अवजारे, कृषीमध्ये महिलांना सोंगणी व कापणी करताना सुलभता जाईल व इजा होणार नाही या दृष्टीने संशोधित झालेली विविध तंत्रज्ञाने,  शेतीपूरक व्यवसायामध्ये व मूल्यवर्धनामध्ये आलेले विविध यंत्र व तंत्रज्ञान, महिलांचे पोषक आहारा संदर्भातील विविध तंत्रज्ञान यासंदर्भातील व या अनुषंगाने येणाऱ्या इतर तंत्रज्ञाना संदर्भात कृषी विज्ञान केंद्रे व इतर तंत्र प्रसाराच्या विविध यंत्रणा यांचा तांत्रिक लाभ घेण्याकरिता महिला व महिला बचत गटांनी समोर येणे गरजेचे आहे.
   ही गोष्ट खरी आहे की धोरणकर्त्यांनी आखलेल्या दूरदृष्टीच्या  सुदृढ धोरणामुळे, शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतिशील शेतकरी महिला व पुरुष व एकंदर लोकसहभागातून महिला प्रगतीचे पाऊल पुढे नक्कीच पडलआहे. हे पुढे पडलेल्या प्रगतीच पाऊल अधिक वेगानं प्रगतीच्या शिखरावर नेण्याकरिता आपल्या सर्वांना हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने आपण नक्की काम करू याची मला खात्री आहे. तेव्हा आजच्या महिलादिनाच्या निमित्ताने चांगले विचार व कृती याचा जागर करूया.  पुन्हा एकदा समस्त माता,भगिनी, युवती, शेतकरी बंधू , व एकंदर तमाम देशवासीयांना जागतिक महिला दिनाच्या कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) व कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम च्या वतीने आणि माझ्या वतीने हार्दिक खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो.

धन्यवाद
राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड (करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?